‘सोहळा कृतज्ञतेचा, सप्ताह संस्कृतीचा, गौरव रंगभूमीचा’ सप्ताहाची शानदार सांगता अहमदनगर | नगर सह्याद्री कांकरिया करंडकने यशस्वीरित्या २५ वर्षे...
‘सोहळा कृतज्ञतेचा, सप्ताह संस्कृतीचा, गौरव रंगभूमीचा’ सप्ताहाची शानदार सांगता
अहमदनगर | नगर सह्याद्री
कांकरिया करंडकने यशस्वीरित्या २५ वर्षे सलग बालरंगभूमीची सेवा केली. या सेवेचा उत्सव करताना त्यांनी जिल्ह्यातील १०१ रंगकर्मीचा हृद्य सन्मान केला. ज्येष्ठांच्या घरी जाऊन व इतरांना आपल्या घरी बोलऊन केलेला हा प्रेमाचा, स्नेहाचा सन्मान एक अलौकिक आनंद देणारा आहे. यामुळे समाजामध्ये एक आदर्श निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी सुनंदा अमरापूरकर यांनी केले.
येथील कांकरिया करंडक राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धा महोत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘सोहळा कृतज्ञतेचा, सप्ताह संस्कृतीचा गौरव रंगभूमीचा’ या सप्ताहाचा सांगता समारंभ साईबन येथे झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी सुनंदा अमरापूरकर उपस्थित होत्या. डोंबिवलीचे प्रसिद्ध साहित्यिक सुरेश देशपांडे, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले, साहित्यिक व विनोदी कथाकथनकार संजय कळमकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमरापूरकर म्हणाल्या, समाजाची उन्नती करणारा एक आदर्श मार्ग कांकरिया करंडकने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त घालून दिला आहे.
डॉटर कांकरिया कुटुंबीय व अमरापुरकर कुटुंबीय एकाच गल्लीत अनेक वर्ष राहत असल्यामुळे आमचा वेगळा घरोबा आहे. डॉ. सुधाताईंच्या व्यक्तिमत्वातील वैद्यकीय, साहित्यिक, नृत्य, बेटी बचाव, सामाजिक, बालनाट्य अशी अनेक पैलू मी जवळून पाहिले आहेत. डॉ. प्रकाश यांचे लेझर ऑपरेशन कौशल्य उत्तम आहे. सख्खे शेजारी असल्याचा आम्हाला नेहमीच आनंद मिळत आला आहे. बालरंगभूमीला समर्पित ’रंगमंच’ ही स्मरणिका एक संदर्भ ग्रंथ आहे. बालरंगभूमीच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश व्हायला पाहिजे.
१०१ कलाकारांचे अनुभव युट्यूवर
‘सोहळा कृतज्ञतेचा, सप्ताह-संस्कृतीचा, गौरव रंगभूमीचा’ या सप्ताहाची सांगता साईबन येथील रवींद्रनाथ टागोर अम्फीलिथीएटर येथे झाली. स्वागताध्यक्ष डॉ सौ सुधा कांकरिया यांनी स्वागत करून सप्ताहाचा उद्देश सांगितला. १०१ कलाकारांची मांदियाळी एकशे एक कलाकारांचे १०१ अनुभव युट्युबद्वारे प्रसारित झाले आहेत. रसिक प्रेक्षकांना व नवोदित कलाकारांना ती नक्कीच प्रेरणादायी आहेत. या सर्व कलाकारांचे प्रेमळ कलापूर्ण सानिध्य आम्हाला प्राप्त झाले, हा आमच्यासाठी एक आनंदाचा ठेवाच आहे. स्व. शाहू मोडक, स्व. मामा तोरडमल, स्व. सदाशिव अमरापूरकरांच्या कलास्पर्शाने अहमदनगरची भूमी पावन झाली आहे. कलेची बिजे या मान्यवरांनी पेरली आणि आता त्याची फळे आपण अनुभवत आहोत. या सर्वांना आम्ही वन्दन करीत असल्याचे डॉ. सौ.कांकरिया म्हणाल्या.
सौ राजश्रीताई घुले, श्री सुरेश देशपांडे यांनी आपल्या भाषणातून कांकरिया करंडकचे कौतुक केले. कार्यक्रमात विद्या जोशी यांनी एकपात्री प्रयोग सादर केला. श्रीमती सुनंदा अमरापूरकर, सुरेश देशपांडे यांचा गौरव रंगभूमीचा, सौ. राजश्रीताई घुले व संजय कळमकर यांचा गौरव कार्यकर्तृत्वाचा असा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी २५ कलाकारांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हे २५ कलाकार म्हणजे कांकरिया करंडक संयोजन समितीचे सदस्य, ज्यांनी २५ वर्षे कांकरिया करंडक स्पर्धेच्या नियोजनाची भूमिका चोख बजावली. यात सदाशिव मोहिते, सौ. विजया मोहिते, उमाकांत जांभळे, सौ. उर्मिला जांभळे, प्रिया सोनटक्के, नंदकुमार देशपांडे, सौ छाया देशपांडे, पुरुषोत्तम दरबस्तवार, मोईनुद्दीन इनामदार, सुभाष बागुल, सौ कविता बागुल, दत्ता इंगळे, मनोहर कटके, सौ सिंधू कटके, प्राची जांभळे, सौदागर मोहिते, सौ कोमल मोहिते, डॉ सुभाष बागले, सौ स्नेहलता बागले, रमेश बाफना, गणपत लोखंडे, वर्षा लोखंडे, रमेश छाजेड, सौ रत्ना छाजेड, श्रीमती हिराबाई पंडित, श्रीमती देवयानी भोपे, रामदास केदार, दीपक सिरसुल, सचिन तुपे, गौरव कुलकर्णी आदींचा समावेश आहे. सन्मान सोहळ्यानंतर संजय कळमकर यांचे विनोदी कथाकथनाचा कार्यक्रम झाला. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी आभार मानले. सुत्रसंचलन डॉ. सुभाष बागले व विद्या जोशी यांनी केले.
COMMENTS