अहमदनगर। नगर सहयाद्री - अग्निवीरमध्ये भरती झाल्याचे बनावट कॉल लेटर घेऊन येथील सोलापूर रोडवर असलेल्या एमआयसी अॅण्ड एसमध्ये ट्रेनिंगला आलेल्य...
अहमदनगर। नगर सहयाद्री -
अग्निवीरमध्ये भरती झाल्याचे बनावट कॉल लेटर घेऊन येथील सोलापूर रोडवर असलेल्या एमआयसी अॅण्ड एसमध्ये ट्रेनिंगला आलेल्या चौघांची बनावटगिरी उघड झाली आहे. त्यांच्यासह बनावट कॉल लेटर देणार्या दोघांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय सैन्य दलाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
एमआयसी अॅण्ड एसमधील आयटी बटालीयनचे सुभेदार शिवाजी रामदास काळे (मूळ रा. डोंगरगण ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. आदर्श नांगेलाल कुंशवाह (वय १९ रा. रात्योरा पो. करपिया ता. कोरॉन जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश), मोहितकुमार माणिकलाल यादव (वय २५ रा. कासीमाबाद सारंगपूर पो. दांडूपुर ता. करचना जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश), आनंद श्याम नारायण शर्मा (वय २३ रा. सडवा कला पी. सी गेट जवळ, पो. टीएसएल ता. करचना जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश), अंशु राजेंद्र कुमार पटेल (वय २० रा. मांझीगांव मरोका पो. दांडी, ता. करचना जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश), लोकेशकुमार तेजपालसिंग राजपूत (वय २५ रा. मिरजापूर ता. जि. गौतमबुद्धनगर, उत्तरप्रदेश) व गोपाल रामकिसन चौधरी (वय २० रा. शिखरना पो. छरा, ता. हातरोली, जि. अलीगढ, उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
अहमदनगर येथील सोलापूर रोडवर असलेल्या भारतीय सैन्य दलाच्या एमआयसी अॅण्ड एस बटालीयनमध्ये अग्निवीरमध्ये भरती झालेली नवीन मुले ट्रेनिंगसाठी येतात. एआरओ व बीआरओ यांच्याकडून बटालीयनला ट्रेनिंगला येणार्या मुलांची माहिती पत्र व्यवहार करून कळविली जाते. त्यानंतर भरती झालेले मुले बटालीयनला रिपोर्ट करतात. २३ मे रोजी रात्री १० च्या सुमारास आदर्श नांगेलाल कुंशवाह, मोहितकुमार माणिकलाल यादव, आनंद श्याम नारायण शर्मा व अंशु राजेंद्र कुमार पटेल हे त्यांच्या नावाचे कॉल लेटर घेऊन गेट नंबर तीनवर आले. गेटवरील बटालीयनचे आर. पी. हवालदार तलवीदंर सिंह यांनी कागदपत्रे तपासली असता त्यांना संशय आला. त्यांनी बटालीयनचे सुभेदार मेजर सत्यवीर सिंह, अॅड्युडेट मेजर राजपूत यांना चार मुलांचे कॉल लेटर बनावट असल्याचा रिपोर्ट दिला. त्यानंतर २४ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता मेजर संजय बिशनोई यांच्या समक्ष त्या चौघांना हजर केले. तेव्हाही कॉल लेटर बनावट असल्याचे आढळले.
मेजर बिशनोई यांनी वरील चार मुलांनी सादर केलेले कॉल लेटरबाबत मेरठ (उत्तर प्रदेश) येथील सैन्य दलाच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी आम्ही आमच्या कार्यालयाकडुन कुठल्याही मुलांना कॉल लेटर देऊन आपले बटालीयनकडे ट्रेनिंगकरीता पाठविले नाही, असे सांगितले. तेव्हा मेजर बिशनोई यांनी अग्निवीरमध्ये भरती झालेल्या मुलांची माहिती असलेल्या आसान अॅपमध्ये चेक केले असता अॅपवर वरील चारही मुलांचे नावे आढळुन आले नाहीत. वरील चारही मुलांनी ट्रेनिंगसाठी येऊन बनावट कॉल लेटर सादर करून भारतीय सैन्य दलाची फसवणुक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता बनावट लेटर लोकेशकुमार तेजपालसिंग राजपुत व गोपाल रामकिसन चौधरी यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. ते नगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनाही अटक केली आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी, उपनिरीक्षक किरण साळुंके, पोलीस अंमलदार अकोलकर, रेवनाथ दहिफळे, गणेश नागरगोजे, संदीप घोडके, राठोड, रघुनाथ कुलांगे, राहुल व्दारके, दीपक शिंदे, रमेश दरेकर, संतोष टेकाळे, अविनाश कराळे, समिर शेख, अरूण मोरे, येणारे यांच्या पथकाने केली आहे.
COMMENTS