कारागृहात शिक्षा भोगत असताना शस्त्रविक्री अहमदनगर | नगर सह्याद्री येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना देखील साथीदारांना संपर्क करून शस्त्र ...
कारागृहात शिक्षा भोगत असताना शस्त्रविक्री
अहमदनगर | नगर सह्याद्री
येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना देखील साथीदारांना संपर्क करून शस्त्र विक्रीचे रॅकेट चालविणार्या शिर्डी येथील कुख्यात गुंड पाप्या शेख व त्याच्या टोळी विरूद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुन्ह्याचा तपास करून प्रस्ताव पाठविला होता.
टोळी प्रमुख सलीम ऊर्फ पाप्या ख्वॉजा शेख (रा. कालीकानगर, शिर्डी ता. राहाता), टोळी सदस्य दत्तात्रय सुरेश डहाळे (वय ३४ रा. श्रीरामनगर, शिर्डी), सुलतान फत्तेमोहमद शेख (वय २९ रा. महलगल्ली, बेलापुर बु. ता. श्रीरामपूर), रवी राजेंद्र बनसोडे (वय २२ रा. गायकवाड वस्ती, शिर्डी), राहुल सिंग (रा. उमटी, मध्यप्रदेश), तनवीर मोहमदहानिफ रंगरेज (रा. कोपरगाव), जेल पोलीस गणेशसिंग विठ्ठलसिंग तौर (वय ५० रा. गावडे कॉलना, टेल्को कंपनी समोर, चिंचवड पुणे), कुमार जगन्नाथ खेत्री (रा. पाटबंधारे कॉलनी मागे, ता. ताकारी वाळवा, जि. सांगली) यांच्यावर कारवाई केली आहे. पाप्या शेख याला शिर्डी पोलीस ठाण्यातील सन २०११ मध्ये दाखल गुन्ह्यात मोक्का कायदा कलमान्वये विशेष न्यायाधीशांनी यांनी शिक्षा ठोठावली होती.
तो सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. शिक्षा भोगत असतानाही त्याने साथीदारांशी संपर्क करून नवीन टोळी तयार केली. टोळीने मध्यप्रदेशातुन गावठी कट्टे व जिवंत काडतुसे श्रीरामपूर शहरात आणली होती. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि ३८४, ३८५, १२० (ब), ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, २७ अन्वये गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत असतांना टोळी प्रमुख पाप्या शेख याच्याविरूद्ध एकुण ३७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्या टोळी साथीदारांवर देखील गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. तसेच पाप्या शेख मोक्क्याच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असतांनाही त्याने सात जणांची टोळी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गावठी कट्टे प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) हे वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळण्याबाबत निरीक्षक आहेर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. महानिरीक्षक शेखर यांनी मोक्का हे वाढीव कलम लावण्यास मंजूरी दिली.
COMMENTS