अलतमश जरीवाला यांचा इशारा | आयुक्तांना दिले निवेदन अहमदनगर | नगर सह्याद्री प्रभाग क्रमांक ११ मधील नागरी सुविधा कोलमोडल्या आहेत. शहरातील मुख...
अलतमश जरीवाला यांचा इशारा | आयुक्तांना दिले निवेदन
अहमदनगर | नगर सह्याद्री
प्रभाग क्रमांक ११ मधील नागरी सुविधा कोलमोडल्या आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ असणार्या या भागातील गटार तुंबल्याने ब्लॉक होणे, कमी दाबाने व खराब पाण्याचा पुरवठा होणे, मंजूर रस्त्यांची कामे रखडणे, मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होणे अशा अनेक गंभीर समस्यांबाबत शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला यांच्या पुढाकारातून मनपा आयुक्त पंकज जाळवे यांची काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, जीतू बोरा, जैकी धनवानी, शकील शेख, योगेश हरबा, रफीक शेख, विश्वनाथ सोमा, प्रवीण हरबा, सलमान शेख, अरश शेख, खैरुल इनाम, प्रदीप पात्रा, हैदर खान, दिलीप राय, अंसार शेख, जीतेन्द्र बाना, रुपचंद्र दिंदा आदींसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले की, प्रभागातील नगरसेवक गायब झाले आहेत अशी नागरिकांची तक्रार आहे. जर नगरसेवक नागरिकांचे प्रश्न सोडवत नसतील तर काँग्रेस प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन छेडेल. अलतमश जरीवाला यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. आयुक्तांना देण्यात आलेला निवेदनात म्हटले आहे की, धरती चौक ते पारशा खुंट चौक ते पिंजार गल्ली रस्त्याचे काम सन २०१८ ला मंजूर झाले आहे. त्याचबरोबर नालबंद खुंट चौक ते जुना कापड बाजार रस्ता मंजूर असून देखील दोन्ही कामांना सुमारे पाच वर्षे उलटूनही सुरुवात झालेली नाही. यामुळे परिसरामधील स्थानिक रहिवासी, व्यापारी बाजारपेठेत येणारे नागरिक यांची गैरसोय होत आहे. यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
त्याचबरोबर प्रभागामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येते. त्यातही खराब पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महिला वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. बर्याच ठिकाणी असणार्या नाल्या तुंबल्या असून पावसाळा लवकरच सुरू होणार आहे. त्यावेळी नागरिकांना घरात राहणे देखील मुश्किल होणार आहे. परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. कुत्रे नागरिकांवरती हल्ला करतात. यात लहान मुले देखील जखमी होतात.
मनपाची यासंदर्भात काम करणारी यंत्रणा कुचकामी असून मोकाट कुत्र्यांची नसबंदी केली जाते की नाही ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. महानगरपालिका जर आमच्या भागाला सुविधा देत नसेल तर या भागातील सर्व रहिवाशांना पाणी पट्टी, घर पट्टी आकारातून वगळण्यात यावे आम्ही स्वखर्चाने आमच्या भागासाठी सुविधा निर्माण करून घेऊ असा खोचक सल्ला यावेळी अलतमश जरीवाला यांनी मनपाला दिला. पुढील दहा दिवसात सदर प्रश्न मार्गी लावले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक नागरिकांना, व्यापार्यांना समवेत घेत कोणतीही पूर्वकल्पना न देता आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जरीवाला यांनी काँग्रेसच्या वतीने दिला आहे.
COMMENTS