भाजप आमदाराचा सहभाग असल्याचा आरोप | उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार अहमदनगर | नगर सह्याद्री जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन कार्यक्रमातील पाणी य...
भाजप आमदाराचा सहभाग असल्याचा आरोप | उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
अहमदनगर | नगर सह्याद्री
जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन कार्यक्रमातील पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाला असून राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अहवाल मागवूनही जिल्हा परिषद सीईओंनी त्याची चौकशी केली नाही. तक्रार करणारी व्यक्तीही दोन महिन्यांपासून बेपत्ता झाली आहे. यासंदर्भात चौकशीची मागणी करणारे निवेदन ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. भाजप आमदार व त्यांच्या स्वीय सहायकाने अधिकारी व कर्मचार्यांशी संगनमत करून घोटाळा केल्याचा आरोपही निवेदनात केला आहे.
जिल्ह्यातील एक भाजप आमदार व त्याच्या स्वीय सहायकाने जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचार्यांशी संगनमत करून जलजीवन मिशन कार्यक्रमातील पाणी योजनांच्या निविदा मॅनेज करण्यासाठी मोठा घोटाळा केला. या सर्व प्रकाराची तक्रार करणारी व्यक्ती बापूसाहेब यशवंत पवार दोन महिन्यांपासून अचानक नगरमधून बेपत्ता झाली आहे. सुमारे ८५० कोटी रूपये खर्चाच्या निविदांबाबत विभागीय आयुक्त, उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी तक्रार केली होती. या गंभीर प्रकाराची दखल घेत पाणीपुरवठा विभागाने चौकशी अहवाल मागवला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी चौकशी केली नसल्याची तक्रार जाधव यांनी निवेदनात केली आहे.
या सर्व प्रकाराची चौकशी होईपर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत कामांची बिले ठेकेदारांना अदा करू नयेत, अशी मागणी जाधव यांनी जिल्हा परिषद सीईओ व जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी तत्कालीन कार्यकारी अभियंता व कर्मचार्यांची अचानक बदली करण्यात आली. त्यांच्या जागी ठराविक कर्मचार्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. त्यातही गैरव्यवहार झाल्याची चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
चौकशी झाल्यास नवीन कर्मचारी नियुक्त करण्यासाठी भाजप आमदाराने मंत्र्यांकडे लेखी शिफारस केली, हे चौकशीत समोर येईल. आमदारांच्या स्वीय सहायकाने सुमारे १५० कोटी रूपयांची कामे स्वतः व इतर ठेकेदार संस्थांच्या नावावर घेतली. पालकमंत्री व खासदार यांना या प्रकाराची माहिती असूनही ते गप्प आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी न होण्यामागे नेमके कारण काय, असाही प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला आहे.
COMMENTS