रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व राष्ट्र सेवा दलाच्या बाल संस्कार शिबिराचा समारोप अहमदनगर | नगर सह्याद्री रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व रा...
रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व राष्ट्र सेवा दलाच्या बाल संस्कार शिबिराचा समारोप
अहमदनगर | नगर सह्याद्री
रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व राष्ट्र सेवा दल अहमदनगर यांनी आयोजित केलेले हे बाल संस्कार शिबिर म्हणजे संस्कार मूल्य अंगीकारून बालमनाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असून आज अशा शिबिरांची खूपच गरज आहे. २८ वे वर्षे संस्कारमाला चालविली जात आहे, ही कौतुकाची बाब आहे. आपल्या मुलांसाठी शिबिर किती आवश्यक आहे हे पालकांच्या लक्षात घेतले पाहिजे. आपल्या पाल्याच्या आवडीनिवडी पाहून जास्तीत जास्त आनंदी व समाधानी राहण्यासाठी आपण पालक म्हणून किती सहभाग देतो याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रावसाहेब पटवर्धन संस्थेचे अध्यक्ष माजी आ. दादाभाऊ कळमकर यांनी व्यक्त केले.
रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित केलेल्या बाल संस्कार शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कळमकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर समितीचे सचिव अॅड. रवींद्र शितोळे, विश्वस्त गणेश गावडे, जगन्नाथ गुंड व सेवा दलाचे कार्यकर्ते गोविंद आडम, बापू जोशी, पुरुषोत्तम जाधव व कराटे तज्ञ आदिल सय्यद उपस्थित होते.
दादाभाऊ कळमकर म्हणाले, जी संस्कार मूल्ये शिबिर कालावधीमध्ये शिबिरार्थींनी आत्मसात केली आहे त्याचे योग्य ते पालन करावे. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते शिवाजी नाईकवाडी यांच्या अथक प्रयत्नाने हे शिबिर खूपच यशस्वी झाले. पालकांचे देखील खूप सहकार्य मिळाले असल्याचे सांगितले.
प्रारंभी रावसाहेब पटवर्धन व साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. खरा तो एकची धर्मफ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे सचिव रवींद्र शितोळे यांनी प्रास्ताविकात म्हणाले, संस्था जे सामाजिक उपक्रम राबवित असते. या उपक्रमांचे अनेकांना चांगला फायदा होत असतो. मुलांसाठी विशेष शिबीर आयोजित त्यांच्यात संस्कार रुजविण्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगितले.
शिबिर प्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी शिबिर कालावधी मधील वृत्तांत सादर केला. या शिबिर कालावधीमध्ये सर्वश्री भूषण देशमुख, डॉ.दर्शन गोरे, विनायक सापा, दिपाली देऊतकर, अनिल डेंगळे, हर्षद कटारिया, प्रिया ओगले-जोशी, सुजाता वाऊत्रे-सब्बन व कराटेतज्ञ आदिल सय्यद या मान्यवरांनी शिबिरार्थींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
शिबिर कालावधीमध्ये शिबिरार्थींनी आत्मसात केलेल्या कलागुणांचे सादरीकरण केले. पालक व शिबिरार्थींनी मनोगत व्यक्त केले. पालकांनी मनोगत व्यक्त करताना सलग अकरा दिवस आमच्या पाल्यांना संस्काराची शिदोरी देणारे व सर्वात कमी प्रवेश फी घेऊन ज्ञानदान करणारे हे एकमेव असे शिबिर आहे. वर्षभर उजळणी शिबिर घेण्यात यावे अशी विनंती केली.
शिबिरार्थी यांचे कडून योगतज्ञ पुरुषोत्तम जाधव यांनी योगा प्रात्यक्षिक करून घेतले. जागर लोकशाहीचा हे पथनाट्य मुलींनी सादर केले. स्वर्गातफ आकाशगंगा या गीतावर शिबिरार्थींनी लयबद्ध नृत्य सादर केले. पालकांनी सुद्धा त्या गाण्याचा मनमुराद आनंद घेतला. सय्यद सरांनी मुला-मुलीं कडून सेल्फ डिफेन्ससाठी कराटेतील काही महत्त्वाचे प्रात्यक्षिक सादर करून घेतले. शिबिरार्थींनी आकर्षक असे कॅलेस्थेनिस कवायत सादर केली. तालबद्ध मयूर लेझीम सादर करून उपस्थितांची शिबिरार्थी व शिबिर सहाय्यक शिक्षक यांनी मने जिंकली.
शिबिर यशस्वीतेसाठी त्यामध्ये पुरुषोत्तम जाधव, गोविंद आडम, बापू जोशी, सुरेखा आडम, साक्षी कर्डिले, नेहा कर्डिले, स्वाती जोशी, ज्ञानेश थोरात, संस्कृती कुलकर्णी, आर्या मिसाळ, नुपूर घटे, आयुषा जाधव, सार्थक भोंग व सोहम दायमा यांनी खूप परिश्रम घेतले. सदरच्या समारोप कार्यक्रमास शिबिरार्थींच्या पालकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी कर्डिले, स्वाती जोशी व शिबिर प्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी केले.
COMMENTS