महापौर रोहिणी शेंडगे यांची माहिती: विविध कार्यक्रमांचे आयोजन अहमदनगर | नगर सह्याद्री प्रोफेसर कॉलनी चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज य...
महापौर रोहिणी शेंडगे यांची माहिती: विविध कार्यक्रमांचे आयोजन
अहमदनगर | नगर सह्याद्री
प्रोफेसर कॉलनी चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १४) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता मनपाच्या रक्तपेढीच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौकात रक्तदान व आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच मर्दानी खेळ, लेझीम, दांडपट्टा, मल्लखांब, तलवार बाजी आदी खेळांचे प्रात्याक्षिके होणार आहे. यावेळी फटायांची आतषबाजी करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
१८ फुटी चबुतरा आणि त्यावर १२ फुटी उंचीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यामुळे नगर शहराच्या वैभवात भर पडणार आहे. त्यांचे विचार नेहमीच समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांच्या ऐतिहासिक कार्याची, विचारांची आठवण म्हणून नगर शहरात त्यांचा पुतळा उभारला जात आहे. नगरकरांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
यावेळी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पाताई बोरुडे, ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक श्याम नळकांडे, माजी नगरसेवक संजय चोपडा, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंते श्रीकांत निंबाळकर, उद्यानप्रमुख शशिकांत नजान, किशोर कानडे, सोनू चौधरी आदी उपस्थित होते.
COMMENTS