उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती; जलजीवनची टेंडर ‘मविआ’च्या काळात अहमदनगर | नगर सह्याद्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्र...
उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती; जलजीवनची टेंडर ‘मविआ’च्या काळात
अहमदनगर | नगर सह्याद्री
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री आ. राम शिंदे यांच्यात कोणताही वाद नाही. वाद असला तरी वादळ अजिबात नाही. आमच्याकडे नेहमीच चांगला समन्वय असतो, असे सांगत भाजपच्या या दोन्ही नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समेट झाल्याचे सांगितले. जलजीवन योजनेचे सर्व टेंडर महाविकास आघाडीच्या काळातील असून, त्याबाबत काही तक्रारी असल्यास त्याची चौकशी करू, असेही फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी नगरमध्ये विश्रामगृहाचे भूमिपूजन व आढावा बैठकीसाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नेते उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, लोकसभा जागा वाटपाबाबत अद्याप शिवसेना आणि भाजप यांची कोणतीही चर्चा नाही. ज्यावेळी चर्चा होईल, त्यावेळी पत्रकारांना सर्व माहिती दिली जाईल. आमच्या दोन्ही पक्षात चांगला समन्वय असून, आमचे चांगले चालले आहे. भाजपकडून अन्याय होत असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार गजानन क्रितीकर यांनी केले असल्याकडे लक्ष वेधले असता खा. किर्तीकर असे कुठेही, काहीही म्हटले नसल्याचे फडणवीस म्हणाले.
आढावा बैठकीत त्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांचे कौतूक केले. त्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात मोजणीची योजना राबविण्यात आली. त्यामुळे मोजणीबाबत असलेली पेडेंन्सी जवळपास संपुष्टात आली आहे. ही योजना आता राज्यात राण्विण्यात येणार आहे. योजना चांगल्या पद्धतीने राबविल्यामुळे त्यांनी विखे पाटील यांच े कौतूक केले. आढावा बैठकीत जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यात आल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. दुसर्या टप्प्यात या योजनेसाठी २५७ गावांची निवड केली असून, त्याच बरोबर गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार ही योजनाही राबविण्यात येणार आहे. या योजनेतून पाणी साठवण क्षमता वाढविण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये चांगले काम झाले आहे. जवळपास ५८ हजार घरे बांधण्यात आली आहेत. शिवाय राज्याच्या योजनेतून २९ हजार घरे आहेत. ओबीसी, एससी, एसटी यांच्यासाठी योजना आल्यामुळे आता जिल्ह्यासाठी पुढील उद्दीष्ट तीनपट वाढणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेची सुरूवातच नगर जिल्ह्यातून राळेगण येथून झाली होती. जिल्ह्यात ८०० पैकी ३०८ फिडरसाठी जागा उपलब्ध झाली आहे. सर्व फिडरसाठी जागा उपलब्ध व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. अवकाळीचा २०२२ चा नुकसानीचा निधी तत्कालीन सरकारने दिला नव्हता, तो आम्ही दिला. यासाठी २९१ कोटी रूपये वर्ग केले आहेत. त्यातील १६१ कोटी वाटप झाले असून, उर्वरित निधीही लवकरच वाटप केला जाईल. अवकाळी नुकसानीचा नंतरचा निधीही दिला असून, याबाबत आता कोणतीही पेडेंसी राहणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
COMMENTS