तत्कालीन खासदार दिलीप गांधींच्याच पाठपुराव्यामुळे कामास मंजुरी अहमदनगर | नगर सह्याद्री कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाच्या कामास तत्कालीन...
तत्कालीन खासदार दिलीप गांधींच्याच पाठपुराव्यामुळे कामास मंजुरी
अहमदनगर | नगर सह्याद्री
कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाच्या कामास तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांच्याच पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय शहराच्या आमदारांनी घेऊ नये, त्यांनी दुसर्याच्या झेंड्यावर पंढरपूर करु नये असा सल्ला भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी यांनी दिला आहे.
नगर कल्याण रोडच्या कामासाठी तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांनी २०११ -१२ साली देशात काँग्रेसची सत्ता असताना प्रस्ताव पाठवून प्रयत्न सुरु केले होते. २०१४ साली देशात परिवर्तन झाल्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्वात प्रध्यानाने या कामास मंजुरी देत स्वतः नगरमध्ये येवून कल्याण विशाखापट्टणम महामार्गाचे भूमिपूजन केले होते. या रस्त्याच्या कामामधून अंदाजपत्रकातील सुमारे ४३ कोटी रुपयांची बचत झाली होती. वाचलेल्या या ४३ कोटी रुपये नगर शहराच्या विकासासाठी मिळावेत अशी मागणी खासदार दिलीप गांधी यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती.
यामधून नगर शहरातील कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाणपूल ते शिवाजीनगर ते अमरधाम ते सक्कर चौक रस्त्याचे दुहेरीकरण करणाच्या कामाचा समावेश होता. तसे पत्र खा.गांधी यांनी २२ फेब्रुवारी २०१७ ला दिले होते. त्यानुसार नगरच्या राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयाने अंदाजपत्रक तयार केले होते. त्यास ७ फेब्रुवारी २०१८ साली राज्याचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी मंजुरीही दिली होती. ४३ कोटीनिधीच्या मंजुर डीपीआर मध्ये या पुलाच्या कामासह तीन किलोमीटर रस्त्याचे दुहेरीकरण, काँक्रीटीकरण, पथदिवे, बंद गटार आदी होणार्या कामांचा उल्लेख होता. नगर कल्याण रोडवरील सीना नदीवर होणार्या पुलाचे काम तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच मंजूर झाले आहे. या कामाचे श्रेय शहराच्या आमदारांनी घेऊ नये. त्यांनी स्वतःचा झेंडा न घेता दुसर्याच्या झेंड्यावर पंढरपूर यात्रा करू नका.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आज हजारो कोटी रुपयांच्या निधीतून जी मोठमोठी विकासकामे सुरु आहेत ती तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांनीच मंजूर करून आणलेली आहेत. त्यांनी जी आश्वासने दिली ती पूर्ण केली आहेत. बोले तैसा चाले... असे काम दिलीप गांधी यांचे होते. नगर शहराच्या वैभवात व विकासात भर घालणार्या उड्डाणपुलाचा दि.८ मार्च २०१९ रोजी झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन संभाषण करून नगर जिल्ह्यातील इतर विविध कामांच्या मंजुरीची घोषणा केली होती. या कार्यक्रमास स्वतः आमदार या नात्याने तुम्हीही उपस्थित होतात. हे विसरलात आपण.
नगरच्या आमदारांनी उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले. पण नुसते निवेदन देवून कामे मंजूर होत नसतात त्यासाठी दिल्लीत पाठपुरावा करावा लागतो. दिलीप गांधी यांनी पाठपुरावा केलेले कागदी पुरावे आमच्याकडे आहेत. या कामास तुमच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाल्याचे एकतरी पत्र तुम्ही दाखवावे. त्यामुळे आमदारांनी न केलेल्या कामाचे श्रेय न घेता नागरिकांची दिशाभूल व फसवणूक थांबवावी. बोगस आयटी पार्क, फसवी फेज २ योजनेने त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना रस्त्यांवरील खड्डे दिसू नये यासाठी पूर्ण शहरात अपुर्या प्रकाशाची पथदिवे लावून त्यांनी नगरकरांच्या फसवणूकीत भर घातली आहे. शहराचे आमदार म्हणून विधायक विकास कामे करता येत नसल्यानेच ते इतराच्या कामाचे श्रेय लाटत आहेत असे सुवेंद्र गांधी यांनी म्हटले आहे.
COMMENTS