नगर ग्रामीण, शिर्डीमध्ये अनुक्रमे अॅड. पोटे, गोंदकर यांची नावे आघाडीवर अहमदनगर | नगर सह्याद्री लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकी...
नगर ग्रामीण, शिर्डीमध्ये अनुक्रमे अॅड. पोटे, गोंदकर यांची नावे आघाडीवर
अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये नवे जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमानपैकी अनेकांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिल्याने तेथे नव्याने जिल्हाध्यक्ष असतील, असे मानले जाते. त्यामुळे इच्छुकांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी नगर लोकसभा मतदारसंघात अॅड. युवराज पोटे आणि शिर्डी मतदारसंघात शिवाजी गोंदकर यांची नावे आघाडीवर असल्याचे बोलले जाते.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्हाध्यक्षपदासाठी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. नगर जिल्ह्यात सध्या तरी इच्छुकांची संख्या जास्त नसली तरी जशी जशी ही निवडणूक जवळ येईल आणि नेते आपला इंटरेस्ट दाखवतील, तशी इच्छुकांची संख्या वाढीस लागण्याची शक्यता आहे. नगर लोकसभा मतदारसंघातून अॅड. युवराज पोटे यांचे नाव सध्या तरी आघाडीवर आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून संघटनेत काम करणारे पोटे भाजपचे एकनिष्ठ मानले जातात. नगर तालुक्यातील रहिवासी असल्याने माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचाही त्यांना हिरवा कंदील असल्याचे बोलले जाते.
शहर जिल्हाध्यक्ष कोण?
नगर शहराच्या जिल्हाध्यक्षपदी सध्या नगरसेवक भैय्या तथा महेंद्र गंधे आहेत. त्यांची कारकिर्द चांगली आहे. संघटना वाढवितानाच नगर शहर विधानसभा मतदारसंघात त्यांनी चांगला संपर्क वाढवला आहे. जिल्हाध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेत त्यांना पुन्हा संधी देणार की, नवीन नियुक्त करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नवीन नियुक्ती करणार, अशी चर्चा भाजपमध्ये आहे. त्यामुळे या पदासाठी पूर्वीपासून इच्छूक असलेले सचिन पारखी यांचे नाव आघाडीवर आहे.
भाजपमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दोन्ही जिल्हाध्यक्ष नियुक्त करताना त्यांचे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मत विचारात घेतले जाईल. संंघटनेत नियुक्त्या करताना मूळ भाजप असलेल्यांना प्राधान्य दिले जाते, असे मानले जाते. त्यामुळे विखे पितापूत्र काय भूमिका घेतात, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
COMMENTS