ठाकरे गटाचा दावा ः अजित पवार समर्थकांकडे अंगुली निर्देश मुंबई | वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवारांनी दिलेल्...
ठाकरे गटाचा दावा ः अजित पवार समर्थकांकडे अंगुली निर्देश
मुंबई | वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवारांनी दिलेल्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचीच चर्चा आहे. यावर ठाकरे गटाने खळबळजनक दावे केले आहेत. त्यात त्यांनी राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शयता आहे.
मुखपत्रात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर नाव न घेता शरसंधान साधले आहे. त्यात म्हटले आहे, की शरद पवारांनी त्यांच्या भावनिक आवाहनाचा व राजीनाम्याचा मसुदा काळजीपूर्वक तयार करून आणला होता व त्यानुसार त्यांनी सर्व काही केले. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे व पक्ष अशा तर्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी, असा सेयुलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही.
त्यांनीच जास्त विलाप केला...
राज्यातील अनेक नेते कुंपणावर आहेत. त्यातील अनेक नावे पवारांच्या पक्षातील आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यात जास्त विलाप केला. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. आज जे पायाशी पडले, तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले, अशा शब्दांत ठाकरे गटाने आसूड ओढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटामुळे राज्यात कधीही भूकंप होईल, असे वातावरण असल्याचा दावा करताना हा गट भाजपच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो, असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला. अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय? शिवसेना फुटली. चाळीस आमदार सोडून गेले, पण संघटन व पक्ष जागेवर आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार गेले तरी जिल्हास्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक प्रयोग असू शकतो, असेही म्हटले आहे.
COMMENTS