कोतवाली पोलिसांनी ठोकल्या तीघांना बेड्या अहमदनगर | नगर सह्याद्री मित्रांनीच मित्राला लुटण्याचा धक्कादायक प्रकार कोतवाली पोलिसांच्या तपासातून...
कोतवाली पोलिसांनी ठोकल्या तीघांना बेड्या
अहमदनगर | नगर सह्याद्री
मित्रांनीच मित्राला लुटण्याचा धक्कादायक प्रकार कोतवाली पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. तीन मित्रानी कर्ज फेडण्यासाठी डाव रचत आपल्याच मित्राला लुटण्याची सुपारी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलासह एक जणास ताब्यात घेतले असून दोघे पसार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर मधील माळीवाडा परिसरात वास्तव्यास असणारा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा त्याच्या एका साथी दारासह दुचाकीवरून केडगाव येथून आगरकर मळ्यामार्गे नगर शहराकडे येत असताना त्यांच्या दुचाकीच्या पाठोपाठ पाठलाग करत दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले. त्यांनी दुचाकीस धक्का मारून अपघात घडवला. त्यानंतर बनाव करत अपघातात झालेले गाडीचे नुकसान भरून देतो, असे म्हणत अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला काही अंतरावर सोबत घेऊन जाऊन त्यांच्या गळ्याला धारदार कोयता धाक दाखवत हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या बळजबरीने काढून घेतल्या व पळून गेले. या प्रकरणी अल्पवयीन मुलाने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारकडून बातमी मिळाली की, सदर गुन्हा हा फिर्यादीच्या तीन मित्रांनी डाव रचत केला आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या तीन अल्पवहीन मित्रांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कर्ज फेडण्याकरिता केल्याची कबुली देऊन त्यांनी सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा त्यांचा मित्र अभिनव विजय सब्बन (रा. सावेडी) याच्याकडे विक्री करिता दिल्याचे सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी अभिनव विजय सब्बन (रा. सावेडी) अटक केली असून ताब्यात घेतलेल्या तिघा अल्पवयीन मुलांनी दोघांना लुटण्याची सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. त्यांची नावे देखील समोर आली आहेत. मंगेश कांबळे व बाबा कावळे (दोन्ही रा. केडगाव) अशी त्यांची नावे आहेत. ते सध्या पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, परि. पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक मनोज कचरे, उपनिरीक्षक मनोज महाजन, अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाढे, याकुब सय्यद, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
COMMENTS