नवी दिलली वृत्तसंस्था- माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार सुरू आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे समर्थक पेशावर, ...
नवी दिलली वृत्तसंस्था-
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार सुरू आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे समर्थक पेशावर, इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोड करत आहेत. आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. रात्री उशिरा रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. लाहोरमधील गव्हर्नर हाऊस जाळण्यात आले. कराचीच्या कँट परिसरात हल्ला झाला. लष्करी मालमत्तेवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जात आहे.
अल कादीर विद्यापीठ घोटाळा प्रकरणी लष्कराने मंगळवारी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केली. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार इम्रान पुढील ४-५ दिवस तपास यंत्रणा एनएबीच्या ताब्यात राहतील. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. इम्रान दोन प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात पोहोचले होते, जिथे पाकिस्तान रेंजर्सने त्यांना अटक केली.
इम्रान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानात हिंसाचार भडकला. पीटीआय समर्थकांनी रात्री उशिरा लाहोरमधील लष्कर कमांडरच्या घराला आग लावली. आणखी अनेक लष्करी अधिकार्यांच्या घरांवर हल्ले झाले. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील खासगी शाळा बंद राहणार आहेत.
अटक योग्य, पद्धत चुकीची...
इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी गृह सचिव आणि इस्लामाबाद पोलीस प्रमुखांना इम्रानला अटक केल्यानंतर १५ मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. पोलीस प्रमुख न्यायालयात हजर झाले नाहीत तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना येथे बोलावले जाईल. या लोकांनी कोर्टात येऊन सांगावे की इम्रान यांना कोणत्या प्रकरणात आणि का अटक करण्यात आली? मात्र, रात्री ११ वाजता तेच न्यायमूर्ती फारुख म्हणाले, अटक योग्य आहे, परंतु पद्धत चुकीची आहे.
खान पंतप्रधान झाल्यावर त्यांनी मलिक रियाझला मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवले. रियाझची ब्रिटनमधील अब्जावधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यानंतर एका डील अंतर्गत ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीने पाकिस्तान सरकारला सुमारे १ हजार ९६९ कोटी रुपये पाठवले होते. इम्रान खान, त्यांची पत्नी आणि इतर पीटीआय नेत्यांनी मिळून ही माहिती मंत्रिमंडळाला दिली नाही. इम्रानने अल कादिर ट्रस्ट ही संस्था स्थापून त्यातून धार्मिक शिक्षण देणारे विद्यापीठ निर्माण झाले. यासाठी मलिक रियाझने कोट्यवधी रुपयांची जमीन दिली.
तसेच बुशरा बीबी यांना हिर्याची अंगठी भेट दिली. त्याबदल्यात रियाझची सर्व प्रकरणे वगळली, असा आरोप आहे. गृहमंत्री राणा सनाउल्ला यांच्या म्हणण्यानुसार सरकारी तिजोरीचे किमान ६० अब्ज रुपयांचे नुकसान झाले. १३ महिन्यांत एकदाही इम्रान किंवा बुशरा चौकशीसाठी आले नाहीत. या विद्यापीठात तीन वर्षांत केवळ ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
एका प्रत्यक्षदर्शीच्या मते इम्रान खान मंगळवारी दुपारी उच्च न्यायालयात दाखल होताच, निमलष्करी दल (पाकिस्तान रेंजर्स) तेथे दाखल झाले. गेट चिलखती वाहनांनी अडवले होते. थोड्या वेळाने इम्रान यांना पकडून बाहेर काढले. त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर हे वाहन मागच्या दाराने अज्ञात स्थळी रवाना झाले.
COMMENTS