मुंबई | नगर सह्याद्री भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचा बनाव रचून मंत्रीपदाच्या बदल्यात भाजप आमदारांकडू...
मुंबई | नगर सह्याद्री
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचा बनाव रचून मंत्रीपदाच्या बदल्यात भाजप आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार्या भामट्याला पोलिसांनी पकडले आहे. या भामट्याने एकूण सहा आमदारांशी संपर्क केला होता.
मंत्रिपदाचे अमिष दाखवत पैसे उकळण्यासाठी ज्या आमदारांना या भामट्याने फोन केला, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या चार आमदारांचा समावेश आहे. नागपूर मध्यचे आमदार विकास कुंभारे यांनाही फोन केला होता. विकास कुंभारे म्हणाले, ७ मे रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान मला एक फोन आला. पलिकडची व्यक्ती म्हणाली, मी जे. पी. नड्डांचा पीए बोलतोय. नड्डा साहेब तुम्हाला दुपारी दीड-दोनच्या दरम्यान फोन करतील. त्यानंतर दोन वाजता मला फोन आला. तो माणूस मला म्हणाला साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. त्यानंतर फोनवर दुसरी व्यक्ती बोलू लागली. ती व्यक्ती म्हणाली, कसे आहात विकासजी. मी म्हटलं ठिक आहे. त्यांनी विचारले तुमच्याकडे कोणती जबाबदारी आहे. मी म्हटलं, पार्टीची माझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही. आमदार म्हणून दिलेली सगळी कामे मी करतो. समोरची व्यक्ती म्हणाली, तुमचं काम खूप चांगलं असल्यामुळे आम्ही तुम्हाला मोठी जबाबदारी देणार आहोत. माझे पीए तुम्हाला फोन करतील. मी म्हटले ठिक आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मला परत फोन आला. पीए म्हणून बोलणारी व्यक्ती मला म्हणाली, विकासजी अभिनंदन! तुम्हाला मंत्रीपद दिलं जाणार आहे. परंतु माझ्यासारख्या गरीब माणसाला विसरू नका. त्यानंतर मी विचार केला, एवढ्या मोठ्या राष्ट्रीय अध्यक्षाचा पीए जो अधिकारी स्तरावरचा असतो त्याची अशी कशी भाषा?
आमदार कुंभारे म्हणाले, या घटनेची माहिती मी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना दिली. त्यांनी मला विचारली तुमच्याकडे पैशांची मागणी केली आहे का? मी त्यांना सांगितलं अजून तरी नाही. त्याच दिवशी मला पुन्हा त्या माणसाचा फोन आला. तो माणूस मला म्हणाला विकासजी तुम्हाला साहेबांनी सांगितलं आहे की, कर्नाटक निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने येण्याची शयता कमी आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला काहीतरी व्यवस्था करावी लागेल. मी म्हटले ठिक आहे. त्यानंतर या फोनची मी पोलीस आयुक्तांना माहिती दिली. कर्नाटकच्या निकालानंतर त्या माणसाचा परत फोन आला आणि म्हणाला, विकासजी कर्नाटकचे जाऊ द्या. बडोद्यात आमचा एक कार्यक्रम आहे. त्याचा बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर जे. पी. नड्डांच्या नावाने दुसरा माणूस म्हणाला, आमच्या पीएंनी बडोद्यात कार्यक्रम ठेवला आहे, त्याच्या जेवणाची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. मी म्हटले ठिक आहे. त्यानंतर पीए मला म्हणाला, १.६६ लाख रुपये बिल झालेय. त्याची व्यवस्था करावी लागेल. या सगळ्याची माहिती मी पोलीस आयुक्तांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आणि फोन नंबर्सच्या आधारे पोलिसांनी त्या भामट्याला पकडले आहे.
COMMENTS