अहमदनगर | नगर सह्याद्री - माहिती अधिकारात रस्त्यांच्या कामासंदर्भात उघड झालेल्या बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी काँग्रेस ...
अहमदनगर | नगर सह्याद्री -
माहिती अधिकारात रस्त्यांच्या कामासंदर्भात उघड झालेल्या बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. २३ मेपर्यंत भ्रष्टाचार्यांवर गुन्हे दाखल न केल्यास शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेत आयुक्त, शहर अभियंता, बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांना आव्हान दिले आहे. नगरकरांसमोर जाहीररीत्या इन कॅमेरा लाईव्ह टेस्ट करत दूध का दूध, पाणी का पाणी करुन दाखवत दोषींवर गुन्हे दाखल करा. अन्यथा आत्मदहनावर ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, प्रवीण गीते, निजाम जहागीरदार, अलतमश जरीवाला, हाफिज सय्यद, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, प्रणव मकासरे, जरीना पठाण, मिनाज सय्यद, सोफियान रंगरेज, शंकर आव्हाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. काळे म्हणाले, रस्त्यांच्या कामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला आहे. नागरिकांना खड्ड्यात घालत निकृष्ट कामे केल्यामुळे बनावट रिपोर्ट जोडले आहेत. जे जोडले ते सुद्धा प्रत्यक्ष पाहणी न करता बनावटरित्या तयार केले. टेस्ट रिपोर्टसाठीचे पत्र मनपाने थेट संबंधित यंत्रणेला देणे आवश्यक आहे. तपासणी अहवाल थेट मनपाकडे जमा होणे आवश्यक आहे. हा अहवाल गोपनीय स्वरूपाचा असल्यामुळे या प्रक्रियेशी ठेकेदाराचा संबंध असू नये. रिपोर्टसाठी सॅम्पल गोळा करताना त्रयस्त संस्था, मनपा अभियंते, ठेकेदार यांच्या सॅम्पल कलेशनवर जॉईंट स्वाक्षर्या, फोटो घेणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही प्रक्रिया केली नसल्याचा दावा काळे यांनी केला आहे. बनावट रिपोर्ट देणारे, निकृष्ट काम करणारे ठेकेदार व पडताळणी न करता ते स्वीकारून त्या आधारे कोट्यावधींची देखके अदा करणारे सर्वच दोषी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने मनपाच्या सर्व अभियंत्यांना नागरिक, प्रसार माध्यमांच्या उपस्थितीत इन कॅमेरा रस्त्यांची गुणवत्ता तपासणी करत अग्निपरीक्षा देण्याचे आव्हान दिले आहे. मनपा आयुक्त भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठीशी घालत आहेत. सध्या चौकशी करणारे अतिरिक्त आयुक्त तांत्रिक अधिकारी नाहीत. ते परिपूर्ण चौकशी करू शकत नाहीत. त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नाशिक विभागाच्या तांत्रिक समितीद्वारे चौकशी व्हावी. थातूरमातूर चौकशी करून घोटाळा दडपण्याचा आयुक्तांचा प्रयत्न असल्याचे म्हणत पीडब्ल्यूडीद्वारे चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे.
त्या नगरसेवकांनी प्रमाणपत्र द्यावीत
घोटाळा झालेला नाही. मनपाची बदनामी केली जात आहे, असे महासभेत म्हणत नगरसेवकांनी भ्रष्टाचार्यांची पाठराखण केली. नगरसेवकांनी भ्रष्टाचार न झाल्याची लेखी प्रमाणपत्र मनपाला द्यावीत, असा खोचक सल्ला काँग्रेसने दिला आहे. काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्याच प्रभागातील रस्त्यांच्या निकृष्ट झालेल्या कामांचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून इन कॅमेरा जाहीर पोस्टमार्टम करून दाखवील. संबंधित नगरसेवकांनी यावेळी उपस्थित राहावे. निकृष्ट कामे झाल्याचे सिद्ध करून दाखवल्यास नगरसेवकांनीही अधिकार्यांबरोबर तुरुंगात जाण्यासाठी सज्ज राहवे, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
COMMENTS