अहमदनगर | नगर सह्याद्री जिल्ह्यात रात्रीच्या वेळी पेट्रोलपंपावरील डिझेलची चोरी करणारे सराईत आंतरजिल्हा आरोपींची टोळी जेरबंद करण्यात आली. त्...
अहमदनगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यात रात्रीच्या वेळी पेट्रोलपंपावरील डिझेलची चोरी करणारे सराईत आंतरजिल्हा आरोपींची टोळी जेरबंद करण्यात आली. त्यांच्याकडून १५ लाख २६ हजार ३२० रूपये किमतीचे २८० लिटर डिझेल व ट्रक जप्त करण्यात आली.
अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत माहिती अशी; की फिर्यादी मनोज पितांबर झांबरे (वय ३५, रा. संगमनेर) यांच्या मालकीचा कसारे (ता. संगमनेर) येथील साई बालाजी पेट्रोलपंपावरील नाईट ड्युटीस असलेले कर्मचारी केबिनमध्ये झोपले असताना आरोपींनी पेट्रोल पंपावरील ३ लाख ५२ हजार ३३० रुपये किंमतीचे ३.७८० लिटर डिझेल चोरून नेले. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथक स्थापन करण्यात आले. पथकात सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ विजय वेठेकर, संदीप पवार, अतुल लोटके, पोना रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ मच्छिंद्र बर्डे, मयुर गायकवाड, रविंद्र घुगांसे, रणजीत जाधव, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, अशोक काळे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, अमृत आढाव व चापोहेकॉ उमाकांत गावडे यांचा समावेश होता. दोन पथके तयार करुन डिझेल चोरी करणार्या आरोपींची माहिती घेण्यास सांगितले.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार जामखेड, खर्डा व उस्मानाबाद परिसरात आरोपींची माहिती घेत असताना पोनि आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार एक इसम ज्याचे नाव तान्हाजी काळे (रा. जोगेश्वरी वस्ती, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) याने त्यांच्या साथीदारासह कसारे (ता. संगमनेर) येथील पेट्रोलपंपावरील चोरी केलेले डिझेल व वाहतुकीसाठी वापरलेली ट्रक त्याच्या राहत्या घरासमोर लावली असल्याचे समजले. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून पंचाना सोबत घेत खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. पथक लागलीच जोगेश्वरीवस्ती (ता. वाशी, जि. उस्मानाबाद) येथे जावुन आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती घेतली. घराजवळ एक विटकरी रंगाचा ट्रक आढळला. खात्री होताच घरामध्ये हजर असलेल्या इसमास बाहेर बोलावून नाव गांव व घरासमोर लावलेल्या ट्रकबाबत विचारले असता, त्याने हा ट्रक मेहुणा मुरलीधर पिंटु शिंदे याचा असल्याचे सांगितले. ट्रकची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये डिझेलने भरलेले प्लॅस्टीकचे ड्रम आढळले.
विचारपूस करता ज्ञानेश्वर विनायक शिंदे (रा. जोगेश्वरीवस्ती) पोपट व्यंकट पवार (रा. येरमाळा, ता. कळंब), अर्जुन व्यंकट पवार (रा. जोगेश्वरीवस्ती), ५) आनंद पवार, (रा. आळणी, ता. जि. उस्मानाबद), दत्तु शिंदे रा. पारा, ता. वाशी) अशांनी मिळुन संगमनेर येथील पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करुन आणल्याचे सांगितले. त्यास ताब्यात घेतले व त्याचे इतर साथीदारांचा शोध घेता दोन साथीदार मिळुन आल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेतले. यातील अर्जून, आनंद व दत्तू हे आरोपी फरार आहेत. चौकशीत आरोपींनी पाथर्डी व शेवगांव येथील पेट्रोल पंपावर डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. फरार असलेला पोपट व्यंकट पवार हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरुध्द उस्मानाबाद जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न व दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
COMMENTS