अहमदनगर | नगर सह्याद्री रणरणत्या उन्हात छत्र्या घेऊन आंदोलन करणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष कि...
अहमदनगर | नगर सह्याद्री
रणरणत्या उन्हात छत्र्या घेऊन आंदोलन करणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर रस्ते घोटाळा प्रकरणातील बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी महाविद्यालयाच्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. यानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब कर्डिले यांची भेट घेत गुन्हे दाखल करण्यासाठीचा मागणी तक्रार अर्ज दिला. यावेळी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, सांस्कृतिक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, कामगार नेते विलास उबाळे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, प्रणव मकासरे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, शहर जिल्हा सहसचिव राहुल सावंत आदींसह शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. काळे म्हणाले की, अहमदनगर शासकीय तंत्रनिकेतनच्या नावाने बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पाटील रिपोर्टचा गैरवापर करत मनपा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कोट्यावधींची बिले काढताना जोडण्यात आली आहेत. शासकीय तंत्रनिकेतनने हे रिपोर्ट दिलेले नसून या बनावट लेटरहेड, शिक्के तयार करण्यात आले असून खोट्या सह्या करून बनावट रिपोर्ट तयार करण्यात आले आहेत.
ही गंभीर बाब आहे. गुरुवारी दुपारी काँग्रेस शिष्टमंडळाने प्राचार्यांची भेट घेऊन तोंडी तक्रार केली होती. त्यानंतर शनिवारी अधिकृतरित्या लेखी तक्रार करून चौकशी करत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शासकीय तंत्रनिकेतनने अहमदनगर महानगरपालिकेकडे सादर झालेल्या बनावट रिपोर्टची माहिती मागवली असल्याची माहिती यावेळी प्राचार्यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला दिली आहे. तसे लेखी पत्र मनपा आयुक्त व मनपा सार्वजनिक बांधकाम विभाग शहर अभियंत्यांना देण्यात आले आहे. तक्रार अर्जाच्या प्रती महामहीम राज्यपाल रमेश भैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्य आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
COMMENTS