मुंबई। नगर सहयाद्री - आज सुप्रीम कोर्टाने राज्याच्या सत्ता संघर्षावर निकाल दिला. कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांक...
मुंबई। नगर सहयाद्री -
आज सुप्रीम कोर्टाने राज्याच्या सत्ता संघर्षावर निकाल दिला. कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुन्हा एकदा सत्याचा विजय झाला. मी आधीच सांगितलं होतं, की लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. देशात कायदा, घटना आहे. त्याच्याबाहेर कुणालाही जाता येणार नाही. आम्ही कायदेशीर पद्धतीनेच सरकार स्थापन केलं आहे. आजच्या निकालात काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींबद्दल देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे. मी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयानेअपेक्षित निकाल दिला. अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयांच्या बाबतीतही सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली. पक्षचिन्हही आम्हाला दिलं आहे, आमच्याकडे बहुमत असल्याने बहुमताच्या आधारावर विधानसभा अध्यक्ष आमदार पात्र की अपात्र या विषयावर निर्णय घेतला जाईल असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. नैतिकतेचा विषय नाही, त्यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय दुसरा काही पर्याय होता का? असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्या अनेकांना ही चपराक आहे, असा टोला देखील शिंदेंनी ठाकरे गटाच्या नेत्यांना लगावला.
COMMENTS