राघव चढ्ढा म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या तक्रारीत माझे नाव आरोपी म्हणून दिलेले वृत्त वस्तुस्थितीनुसार चुकीचे आहेत.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांचे नाव आता ईडीच्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रात आले आहे. ईडीच्या पुरवणी आरोपपत्रात अशी माहिती देण्यात आली आहे की, सिसोदिया यांचे माजी सचिव सी अरविंद यांनी तपास एजन्सीला सांगितले होते की, मनीष सिसोदिया यांच्या घरी झालेल्या बैठकीत राघव चढ्ढा उपस्थित होते. मात्र, राघव चढ्ढा यांना आरोपपत्रात आरोपी करण्यात आलेले नाही. आम आदमी पक्षाचे खासदारा राघव चढ्ढा यांनी असे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून काही मीडिया हाऊस वस्तुस्थितीनुसार चुकीची माहिती देत असल्याचे म्हटले आहे.
आरोपपत्रानुसार, मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी पंजाब सरकारचे एसीएस वित्त, उत्पादन शुल्क आयुक्त वरुण रूजम, एफसीटी आणि पंजाब अबकारी अधिकार्यांसह एक बैठक झाली, ज्यामध्ये विजय नायर व्यतिरिक्त राघव चढ्ढा देखील उपस्थित होते.
राघव चढ्ढा म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या तक्रारीत माझे नाव आरोपी म्हणून दिलेले वृत्त वस्तुस्थितीनुसार चुकीचे आहेत. हे माझी प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता खराब करण्याच्या दुर्भावनापूर्ण मोहिमेचा भाग असल्याचे दिसते. अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या कोणत्याही तक्रारींमध्ये माझे नाव आरोपी किंवा संशयित म्हणून घेतलेले नाही. या तक्रारींमध्ये माझ्यावर कोणताही आरोप नाही.
राघव चढ्ढा पुढे म्हणाले की, तक्रारीत माझ्या नावाचा उल्लेख एखाद्या बैठकीला उपस्थित असलेली व्यक्ती म्हणून करण्यात आला आहे, परंतु असे आरोप करण्याचा आधार स्पष्ट नाही. सदर मीटिंगच्या संबंधात किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणत्याही कथित गुन्ह्यांमध्ये मी असल्याचे स्पष्टपणे नाकारतो. मी मीडिया आणि प्रकाशन संस्थांना विनंती करतो की कोणतेही चुकीचे वृत्तांकन करू नका आणि या समस्येचे स्पष्टीकरण द्या, अन्यथा मला कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल.
COMMENTS