सोमवारी, २२ मे रोजी मुंबईतील अंधेरी येथील त्याच्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला.
मुंबई / नगर सह्याद्री -
अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूतने जगाचा निरोप घेतला आहे. सोमवारी, २२ मे रोजी मुंबईतील अंधेरी येथील त्याच्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला. इमारतीच्या ११व्या मजल्यावर राहणाऱ्या आदित्यचा मृतदेह पहिल्यांदा त्याच्या एका मित्राने पाहिला. आदित्य बाथरूममध्ये जमिनीवर बेशुद्ध पडला होता. मित्राने याची माहिती पहारेकरीला दिली. अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच आदित्यचे निधन झाले होते.
मुंबई पोलिसांनी आदित्य सिंग राजपूतचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्याचवेळी, ड्रग ओव्हरडोसमुळे आदित्य सिंह राजपूतचा जीव गेल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणताही खुलासा केलेला नसून, संपूर्ण तपासानंतरच निष्कर्ष काढायचा आहे.
दिल्लीत जन्मलेल्या आदित्य सिंग राजपूतचे कुटुंब मूळचे उत्तराखंडचे आहे. आदित्यने वयाच्या १७ व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवले. दिवंगत अभिनेत्याच्या पश्चात आई-वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे. आदित्य सिंग राजपूतला टेलिव्हिजन रिऍलिटी शो 'स्प्लिट्सविला' मधून लोकप्रियता मिळाली. मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यने जवळपास ३०० टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले.
अभिनयाच्या जगात काम करत असताना, आदित्य सिंग राजपूतने स्वतःचा ब्रँड 'पॉप कल्चर' सुरू केला, ज्या अंतर्गत त्याने कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले. आदित्य काही काळ कास्टिंग डायरेक्टर म्हणून त्याच्या करिअरमध्ये पुढे जात होता. फिल्मी दुनियेपासून ते मुंबईच्या पेज-थ्री पार्टीपर्यंत या अभिनेत्याची चांगलीच ओळख होती.
COMMENTS