मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. या दोघांमध्ये कधी भांडणं होत असतील का, असा प्रश्न...
मुंबई :
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. या दोघांमध्ये कधी भांडणं होत असतील का, असा प्रश्न अनेकदा चाहत्यांना पडतो. तर 2010 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकने दररोज भांडणं होत असल्याचा खुलासा केला होता. ऐश्वर्याने त्याला भांडण असं म्हटलं होतं, तर अभिषेकने त्याला ‘मतभेद’ असं नाव दिलं होतं. भांडण झाल्यास दोघं काय करतात, याबद्दलही ते या मुलाखतीत व्यक्त झाले होते.
अभिषेकने ऐश्वर्याला 2007 मध्ये लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्याआधी दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. 20 एप्रिल 2007 रोजी या दोघांनी मुंबईत लग्नगाठ बांधली. या लग्नाला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी हजर होते. लग्नाबद्दल बोलताना ऐश्वर्या आणि अभिषेकला एका मुलाखतीत त्यांच्यात होणाऱ्या भांडणाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. जुलै 2010 मध्ये दोघांनी ‘वोग इंडिया’ला ही मुलाखत दिली होती. तुम्ही कधी भांडता, असा प्रश्न विचारला गेला असता त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणाली, “ओह, दररोज”. ऐश्वर्याच्या या उत्तराचं स्पष्टीकरण देताना अभिषेक म्हणाला, “पण ते भांडणापेक्षा जास्त मतभेद असतात.
त्यात गांभीर्य नसतं, पण हेल्थी चर्चा असते. अन्यथा आयुष्य खूपच कंटाळवाणं वाटलं असतं.” भांडणानंतर सर्वांत आधी कोण माफी मागतं याविषयी बोलताना अभिषेक म्हणाला, “मीच. महिला भांडण मिटवत नाहीत. पण आम्ही एक गोष्ट ठरवली आहे की भांडण मिटवल्याशिवाय आम्ही झोपत नाही. सर्व पुरुषांच्या वतीने मी हे सांगू इच्छितो की बऱ्याचदा आम्ही यासाठी हार मानून माफी मागतो, कारण आम्हाला खूप झोप येत असते. याशिवाय महिला नेहमीच योग्य असतात. ही गोष्ट पुरुष जेवढ्या लवकर मान्य करतो, तेवढं चांगलं असतं. तुमच्याकडे ठोस पुरावे असूनही काही फायदा नसतो. महिलांच्या विश्वात त्याला काही महत्त्व नसतं.”
अभिषेक आणि ऐश्वर्याने गेल्या महिन्यात लग्नाचा 16 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी इन्स्टाग्रामवर दोघांनी एकमेकांसोबतचा सेल्फी पोस्ट केला होता. ऐश्वर्या नुकतीच मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर दुसरीकडे अभिषेक लवकरच ‘द बिग बुल’च्या सीक्वेलमध्ये झळकणार आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक पहिल्यांदा 1999 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या त्यांच्या चित्रपटाच्या फोटोशूटदरम्यान भेटले होते. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल अभिषेकने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “ढाई अक्षर प्रेम के हा पहिला चित्रपट आम्ही एकत्र केला होता. त्यावेळी ऐश्वर्याला पाहून मी तिच्यासाठी वेडाच झालो होता.” चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. या चित्रपटानंतर दोघंही रमेश सिप्पी यांच्या ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात एकत्र दिसले. मात्र, ‘उमराव जान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली.
COMMENTS