स्वत:ला जाळून घेतलेल्या व्यक्तीला जिवंतपणीच मृत घाेषित केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
स्वत:ला जाळून घेतलेल्या व्यक्तीला जिवंतपणीच मृत घाेषित केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात हा प्रकार घडला आहे. हृदयद्रावक घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले. या गंभीर प्रकरणाची रुग्णालयाच्या वरिष्ठ स्तरावरून माहिती घेतली जात आहे.
नितीन सुरेश मोरे यांनी २२ रोजी दुपारी स्वत:च्या दुकानात पेट्रोलने पेटवून घेतले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते ९३ टक्के भाजलेले असून गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मोरे यांची काहीच हालचाल दिसली नाही.
प्रशिक्षणार्थी डॉ. नलवाडे यांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर इसीजी घेतला. इसीजीचा रिपोर्ट फ्लॅट (सरळ रेष) आल्याने त्यांनी मोरे मयत झाल्याचे सांगितले. त्यावेळी मोरे यांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांनीही रुग्णालयीन व पाेलिस प्रक्रियेनुसार सिव्हिल पोलीस चौकीत रुग्ण मयत झाल्याची माहिती दिली.
मात्र, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मयत मोरे यांच्या पायांची मंद हालचाल वॉर्डात उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिसले. त्यांनी ईसीजी रिपोर्ट घेतला असता रुग्णाच्या हृदयाचे ठोके सुरु हाेते. त्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू झाले. मात्र मृत मोरे जिवंत असल्याचे नातेवाईकांना समजताच त्यांचा संताप अनावर झाला.
कुटुंबीयांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वॉर्डातील नर्स आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. आठ वाजता पुनरुज्जीवित झालेले मोरे यांचे हृदय साडेनऊच्या सुमारास पुन्हा थांबले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची नाडी तपासली. त्याचे हृदय सुरू करण्याचा वारंवार प्रयत्न केल्यानंतर त्याचे हृदय पुन्हा सुरू झाले. या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
COMMENTS