याप्रकरणी मालवणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १५ मोबाईल फोन, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे सिमकार्ड, बँकांचे क्रेडिट कार्ड जप्त केले आहेत
मुंबई / नगर सह्याद्री -
दिल्लीत बसून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, एअर एशिया, रिलायन्स, जिओ यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा मुंबईतील मालवणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १५ मोबाईल फोन, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे सिमकार्ड, बँकांचे क्रेडिट कार्ड जप्त केले आहेत.
संतोष कुमार रतनसिंग कामती (वय ३३वर्षे) आकाश श्रीपाल यादव (२३ वर्षे), अल्ताफ हुसेन अब्दुल मन्नान (२३ वर्षे), चंदा सिंग राजेश राय (४० वर्षे) आणि हेमलता गौरीशंकर राठोड (३६ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मालाड मालवणी परिसरात राहणारे विजय पवार यांना एअरपोर्ट येथील ग्राउड स्टाफ करीता नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये २,४५,६०० रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, विजयला नोकरी न मिळाल्याने आर्थिक फसवणूक झाल्याने विजय पवार यांनी मालवणी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. या कलमानुसार ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब ) भा.द. वि.स माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६ (ड ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करत असताना मालवणी पोलिसांनी या गुन्ह्याची फसवणूक झालेल्या बँक खात्याची माहिती गोळा केली आणि बँक खातेदाराला त्याच्या हरियाणा येथील फरीदाबाद येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यासंदर्भात दोन्ही आरोपींकडे चौकशी केली.
त्यांच्याकडे अधिक चौकशी करुन सनलाईट कॉलनी, दिल्ली येथे सापळा रचून फोन करणाऱ्या इतर तीन आरोपीना रेड हॅन्ड ताब्यात घेतले. सध्या या आरोपींच्या टोळीने मुंबई शहरात किती लोकांना गंडा घातलेला आहे, या टोळी मध्ये आणखी काही सदस्य आहेत का या सर्व विषयी अधिक तपास मालवणी पोलीस करत आहे.
COMMENTS