मुंबई। नगर सहयाद्री भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बुधवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. येत्या निवडणुकीची...
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बुधवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. येत्या निवडणुकीची तयारी लक्षात घेऊन ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यांचा हा दौरा संघटनात्मक बळकटीसाठी असला, तरी या दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय नेतृत्व मुंबईत विनोद तावडेंना बळ देताना दिसत आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,आगामी निवडणुकीची तयारी लक्षात घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा महाराष्ट्र दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जेपी नड्डा आज मुंबईत पोहोचतील.मात्र, या दौऱ्यात ते बोरिवलीत तावडे यांच्या आमदारकीच्या काळात बांधलेल्या अटल स्मृती उद्यानालाही भेट देणार आहेत.
याशिवाय नड्डा हे तावडेंच्या घरी स्नेहसंमेलनासाठी पण जाणार आहेत. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुंबई दौऱ्यावर असताना तावडे यांच्या घरी भेट दिली होती. केंद्रीय नेतृत्वाने तावडेंना विशेष महत्त्व दिल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये राजकीय अस्वस्थतेचे वातावरण आहे.
विनोद तावडे सध्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदावर कार्यरत आहेत. ते मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषवले आहे. विनोद तावडे आमदार झाल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे विद्यमान आमदार असूनही त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नाही.
COMMENTS