मुंबई । नगर सहयाद्री - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यापासून राज्य...
मुंबई । नगर सहयाद्री -
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यापासून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीच्या अनेक आमदार, नेते, जिल्हाध्यक्षांनी मुंबईत धाव घेतली आहे. पवार यांनी राजीनामा देऊ नये म्हणून त्यांना आग्रह केला जात आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर या सर्व राजकारणाचा केंद्रबिंदू झाले आहे. बुधवारी सकाळीच शरद पवार सेंटरमध्ये आले असून, राज्यभरातून आलेल्यांची मते जाणून घेत आहेत. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने आणि राजीनामा सत्र सुरू झाल्याने पूनर्विचारासाठी दोन दिवस त्यांनी मागितले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी (ता. २) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात निवृत्तीची घोषणा केली. तेव्हा सभागृहातच आमदार, खासदार, पदाधिकार्यांनी या निर्णयाला विरोध करून घोषणाबाजी केली. यावेळी अनेक नेते, पदाधिकार्यांना अश्रूही अनावर झाले. काही कार्यकर्त्यांनी त्यांचा रस्ता अडवला. ते घरी गेल्यानंतरही कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला होता. अखेर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी २-३ दिवसांचा वेळ द्या, अशी समजूत शरद पवारांनी घातली. त्यानंतर आज सकाळपासून शरद पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओकवर पवारांची मनधरणी करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकार्यांची रीघ लागली.
राजीनामा सत्र
शरद पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकार्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. साहेबांनी राजीनामा मागे न घेतल्यास सामूहिक राजीनामे देणार, असा ठराव सोलापूर राष्ट्रवादीने केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील पदाधिकार्यांनीही इशारा दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे काम करणार नाही, असे म्हटले आहे. पुणे व जळगाव येथील काही कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहित शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे.
शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहे. त्यानंतर शरद पवार यशवंतराव चव्हाण सभागृहात आले. त्यांच्यासोबत खा. सुप्रिया सुळे देखील आहेत. येथे पवार राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. आपण जाहीर केलेल्या राजीनामाच्या निर्णयाबाबत ते कार्यकर्ते, पदाधिकार्यांची मते जाणून घेणार आहेत. यानंतर शरद पवार निवृत्तीच्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शयता असल्याने ते काय निर्णय घेतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे शासकीय निवासस्थान देवगिरी बंगल्यावर पक्षातील नेत्यांची बैठक होत आहे. यामध्ये शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीवर चर्चा सुरू आहे.
शिवसैनिकांना आठवला बाळासाहेबांचा राजीनामा
शरद पवार यांनी काल अचानक आपण पक्षाध्यक्षपद सोडणार असल्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी शिवसैनिकांना ४५ वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कशी परिस्थिती ओढवली होती, त्याची आठवण झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शेकडो शिवसैनिकांनी ’मातोश्री’कडे धाव घेत आक्रोश केला होता. शिवसैनिकांनी भर पावसात मातोश्रीबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर बाळासाहेबांनी सर्वांच्या भावनांचा आदर राखत निवृत्तीची घोषणा मागे घेतली होती. असेच काहीसे शरद पवार यांच्याही बाबतीत घडते की काय, याबाबत चर्चा रंगली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे. काल रात्रीपर्यंत शरद पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू होती. निवृत्तीच्या निर्णयापासून माघार घेणार नसल्याचे संकेत शरद पवारांनी या बैठकीतही दिले. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांची पवारांच्या घरी सुमारे दोन तास बैठक झाली. या सर्वांनी पवारांना निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनवणी केली. हवे तर कार्याध्यक्ष नेमा पण आपण पक्षाध्यक्ष राहा, असे या नेत्यांनी आवाहन केले. पण पवार निर्णयावर ठाम राहिले. पदाधिकारी उपोषण, राजीनाम्यावर ठाम असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर मीही तितकाच हट्टी असल्याचे त्यांनी सांगितले. पण नेत्यांची समजूत काढण्यासाठी त्यांनी दोन दिवस विचार करून सांगतो, असे सांगून वेळ मारून नेली.
COMMENTS