अमृत पाणी योजनेमुळे शहराच्या विकासाला चालना; उपमहापौर गणेश भोसले अहमदनगर | नगर सह्याद्री शहराच्या वाढत्या लोकवस्तीचा विचार करून केंद्र सरकार...
अमृत पाणी योजनेमुळे शहराच्या विकासाला चालना; उपमहापौर गणेश भोसले
अहमदनगर | नगर सह्याद्री
शहराच्या वाढत्या लोकवस्तीचा विचार करून केंद्र सरकारच्या वतीने नगर शहराला अमृत पाणी योजना मंजूर झाली होती. आता त्या योजनेचे काम पूर्ण झाले असून अमृतचे पाणी वसंत टेकडी येथील ५० लाख लिटर टाकीमध्ये पडले आहे. अखेर नगरकरांची प्रतीक्षा संपली असून संपूर्ण शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार आहे. बहुप्रतिक्षित अमृत पाणी योजनेचे काम पूर्णत्वास गेले असून मुळा धरण ते नगर शहरातील वसंत टेकडी पर्यंत ३४ किलोमीटर पर्यंत ११०० मि.मी. व्यासाची पाईप लाईन टाकण्यात आली आहे.
पुढील ४० वर्षाचा विचार करून ही योजना पूर्ण झाली आहे. विळद पंपिंग स्टेशन येथे ४५ दशलक्ष लिटरचे नवीन जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. याच ठिकाणी पंप हाऊस, विद्युत सबस्टेशन उभारण्यात आले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहराचे कायमस्वरूपी एक एक विकासाचे प्रश्न मार्गी लागत असून अमृत पाणी योजनेमुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडी पर्यंत अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी यशस्वी होऊन टाकीत पाणी पडले. याची पाहणी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ.पंकज जावळे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक श्यामआप्पा नळकांडे, जल अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.
आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले की, अमृत जलवाहिनीच्या चाचणीचे काम अंतिम टप्प्यात असून वसंत टेकडी येथील टाकीत योजनेचे पाणी आले आहे. उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ ते दहा दिवसात ही योजना कार्यान्वित होऊन नगरकरांना या योजनेचे पाणी मिळेल योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील सर्व भागात वेळेवर आणि पूर्ण दाबाने पाणी देण्यासाठी नियोजन केले जाणार आहे असे ते म्हणाले.
जल अभियंता परिमल निकम म्हणाले की, अमृतपाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली आहे. चाचणी दरम्यान आलेले अडथळे दूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथे आठ ते दहा दिवसात नागरिकांना या योजनेतून पाणी मिळणार आहे. शहरातील आधीच्या जलवाहिन्यांमधून अमृतचे पाण्याचे वितरण केले जाणार आहे असे ते म्हणाले.
COMMENTS