शरद पवार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरात चर्चा मुंबई । नगर सहयाद्री शरद पवार यांनी राजीनामा देण्याच्या निर्णयापासून यू टर्न घेतल्य...
शरद पवार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरात चर्चा
मुंबई । नगर सहयाद्री
शरद पवार यांनी राजीनामा देण्याच्या निर्णयापासून यू टर्न घेतल्याने सर्वाधिक तोंडघशी विरोधी पक्षनेते अजित पवार पडले असल्याचे मानले जाते. त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला पाठ दाखविल्याचीही चर्चा आहे.
दौर्यामुळे प्रेसला अनुपस्थित : अजित पवार
शरद पवार यांची पत्रकार परिषद सोडून अजित पवार पुण्याच्या दिशेने निघाले. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, ६ तारखेपासून माझा दौंड, कर्जत दौरा आहे. पुढे १२ तारखेपर्यंत माझा विविध भागांत दौरा आहे. त्यामुळे मी पत्रकार परिषदेला हजर राहू शकलो नाही.
२ मे रोजीच्या शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला तेव्हा त्यास सर्वांनीच विरोध केला. एकमेव अजित पवार त्यांच्या निर्णयाचे समर्थन करत होते. तीव्र भावना व्यक्त करणार्यांना खडसावतही होते. मात्र निवड समितीच्या बैठकीत सर्वांच्या सुरात सूर मिसळत निर्णय मागे घेण्याच्या ठरावावर त्यांना सही करावी लागली. त्यानुसार शरद पवारांनीही निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याने सर्व कार्यकर्ते खुश झाले. असे असले तरी या सर्व प्रकरणात अजित पवार तोंडघशी पडल्याची चर्चा सुरू झाली. त्यात त्यांनी पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवल्याने या चर्चेला अधिक बळ आले.
ज्यांना जायचे त्यांनी जावे; पवार
पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित नसल्याकडे लक्ष वेधले असता, शरद पवार म्हणाले, सर्व कार्यक्रमांना सर्वच नेत्यांनी उपस्थित राहावे असे नसते. कुणी आहे, कुणी नाही असा श्लेष करण्याची गरज नाही. कुणाला पक्ष सोडून जायचे असेल त्यांनी खुशाल जावे; पण आमच्या पक्षात असे कुणी नाही. अजित पवार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत.
उत्तराधिकारी नेतृत्त्व तयार करण्याकडे माझा कल राहील, असे सांगत पवार यांनी राजीनामा मागे घेतला. त्यावर तुमचा उत्तराधिकारी कोण, असा विचारले असता पवार म्हणाले, राजकीय पक्षात उत्तराधिकारी ठरवला जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीचा बॅकअप कोण, असा पुढचा प्रश्न केला असता ते म्हणाले, आमचे सर्व नेते पक्षाचा बॅकअप आहेत. त्यांच्यात राज्य व देश चालवण्याची क्षमता असल्यानेच मी निवृत्तीचा विचार केला होता.
निर्णयाचे स्वागत; अजित पवार
कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करून शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा आहे. महाविकास आघाडी व देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष उज्ज्वल यश संपादन करेल. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली.
COMMENTS