पारनेर / नगर सह्याद्री - न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे,ता.पारनेर या शाळेतील इ. १०वी सन १९८७ च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३६ वर्षांनंतर एकत...
पारनेर / नगर सह्याद्री -
न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे,ता.पारनेर या शाळेतील इ. १०वी सन १९८७ च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३६ वर्षांनंतर एकत्र येऊन मांड ओहोळ धरण, ता.पारनेर येथे आपल्या गुरूजन व सेवकवृंदांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नुकताच स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित केला.
कार्यक्रमात प्रथमतः सर्व विद्यार्थीनींनी सन्माननीय शिक्षकांचे औक्षण करून स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात तत्कालीन उपस्थित सर्व गुरूजनांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन , विद्येची देवता श्री सरस्वती पूजन करून व सामूहिक प्रार्थना गायनाने झाली. तदनंतर सर्व आदरणीय गुरूजन व सेवकवृंदांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने स्मृतिचिन्ह व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सर्व शिक्षकांच्या गुणवैशिष्ट्यांसह श्री सुंदर झावरे यांनी त्यांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात सौ. संगिता औटी, भास्कर दाते गुरूजी , वैद्य विलास जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करून त्यावेळच्या शाळेतील हृद्य आठवणी व प्रसंग सांगत सर्वांना भूतकाळात नेले.उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी सर्वांना आपली कौटुंबिक ओळख करून दिली.
त्यानंतर उपस्थित श्री गुलाबराव शिंदे सर,श्री रामचंद्र झावरे,श्री रभाजी झावरे, श्री प्रकाश इघे,श्री. भाऊसाहेब आहेर,श्री व सौ. सरोदे, श्री बाळासाहेब भालके , श्री बुचडे सर, श्री शिवाजी खामकर, श्री साळुंके गुरूजी यांनी आपापली कौटुंबिक ओळख करून दिली व मार्गदर्शनपर सर्व विद्यार्थ्यांप्रति स्नेह भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमासाठी श्री वाकचौरे भाऊ, तुकाराम पाटील दाते, बाळासाहेब झोंबाडे इ. सेवकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालीन मुख्याध्यापक श्री.व्ही.जी. जाधव सर यांनी वडिलकीच्या नात्याने सर्वांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पूर्वीच्या काळी शिक्षक- विद्यार्थी या नात्याबरोबरच एकमेकांशी पालक- पाल्य असेही गोड नाते होते. शिक्षण हीच सर्वांची खरी श्रीमंती असून आपण सर्वांनीच यापुढील काळात समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना तसेच आपल्यापैकी अडचणीत असलेल्या स्नेहीजनांना एकत्र येऊन मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याची आवश्यकता आहे व तशी कृती करण्यासाठीचे सर्वांना आवाहन केले.
प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांचा गुरू जनांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मोहन वाळुंज, सूत्रसंचालन सुदाम साळुंके गुरूजी यांनी केले तर पोपटराव उगले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानिक पातळीवर श्री दिलीप पाटोळे, अनिल साळुंके, बबन बोबडे, दत्तात्रय हिंगडे यांनी विशेष परिश्रम घेतले व आयोजनात सर्वच सहपाठींचे योगदान लाभले. कार्यक्रमासाठी पुणे, नगर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आदी विविध ठिकाणांहून व स्थानिक असे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता सामूहिक विश्वगीत पसायदानाने होऊन तदनंतर उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे मनमोकळ्या गप्पा मारत कौटुंबिक स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला..
COMMENTS