बीड। नगर सहयाद्री - बीडमध्ये एक दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. बीडच्या मादळमोही गावात डॉक्टर नसल्यामुळे उपचाराअभावी एका मजूराचा ...
बीड। नगर सहयाद्री -
बीडमध्ये एक दुर्दैवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. बीडच्या मादळमोही गावात डॉक्टर नसल्यामुळे उपचाराअभावी एका मजूराचा रुग्णालयाच्या गेटवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रोशनलाल हंसराज चित्ते (५० वर्षे) असं या मजूराचे नाव आहे. तो मूळचा पंजाब राज्यातील रहिवासी असून बीडमध्ये जिनिंग मजूर म्हणून काम करत होता.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मूळचा पंजाब राज्यातील रहिवासी रोशनलाल चित्ते हे मादळमोही परिसरात असणाऱ्या सारडा जिनिंगवर मजूरी काम करत होते. कामावरून सुट्टी झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्याला तात्काळ जिनिंगमधील उपस्थित कामगारांनी मादळमोहीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यामुळे रोशनलाल हे अत्यवस्थ अवस्थेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात डॉक्टरची वाट पहात पडून होते. पण तब्बल एक तास होऊ देखील डॉक्टर न आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच त्यानी तडफडत प्राण सोडले. दांडी बहाद्दर डॉक्टरांमुळे उपचाराअभावी रोशनलाल यांचा मृत्यू झाला.
रोशनलाल यांच्या उपचारासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अरुण लोकरे यांना फोनवरून संपर्क साधण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी 'मी आंघोळ करतोय थोड्या वेळात कॉल करतो असे उत्तर देऊन फोन ठेवला. पण त्यानंतर एक तासाने फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला नाही. या घटनेमुळे मादळमोही ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
या दांडी बहाद्दर डॉक्टरांमुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी एका महिलेची डिलिव्हरी आरोग्य केंद्राच्या दारातच झाली होती. त्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा मन हेलावणारी घटना घडली असून उपचारा अभावी एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
COMMENTS