सुनील चोभे | नगर सह्याद्री नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी येत्या सोमवारी (दि. २२) निवडणूक होणार आहे. सभापत...
सुनील चोभे | नगर सह्याद्री
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी येत्या सोमवारी (दि. २२) निवडणूक होणार आहे. सभापती व उपसभापतिपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे तालुयाचे लक्ष लागले आहे. सभापतिपदासाठी भाऊसाहेब बोठे, सुधीर भापकर, हरिभाऊ कर्डीले, संतोष म्हस्के यांची नावे चर्चेत असून उपसभापतिपदासाठी मधुकर मगर व रभाजी सूळ ही नावे चर्चेत आहेत.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची नुकतीच निवडणूक झाली. संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व १८ जागांवर भाजप नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे.
सोमवारी (दि. २२) नूूतन संचालकांची विशेष सभा होणार आहे. सभेत सभापती व उपसभापतींची निवड केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक देविदास घोडेचोर काम पाहणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात ही विशेष सभा होणार आहे.
सभेमध्ये ११ ते ११.३० या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर ११.३० ते ११.४५ दरम्यान अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. अर्ज माघारीसाठी ११.४५ ते १२ असा कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया होईल.
सभापती व उपसभापतिपदाचे नाव माजी आ. शिवाजी कर्डिले व भानुदास कोतकर यांच्याकडून निश्चित केले जाणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
COMMENTS