महावितरणकडून ‘रोहित्र पे रोहित्र’ बसविण्याचा प्रताप | एका महिन्यात बसवले तब्बल सहा रोहीत्र सुपा | नगर सह्याद्री केंद्र आणि राज्य सरकारकडून...
महावितरणकडून ‘रोहित्र पे रोहित्र’ बसविण्याचा प्रताप | एका महिन्यात बसवले तब्बल सहा रोहीत्र
सुपा | नगर सह्याद्री
केंद्र आणि राज्य सरकारकडून चर्मकार वस्तीसाठी विविध योजना राबविल्या जातात. यात प्रामुख्याने विज, रस्ते, घरकुल, पाणी योजनेला विशेष प्राधान्य दिले जाते. अशीच पारनेर तालुयातील भोयरे गांगर्डा येथील चर्मकार वस्तीसाठी गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी स्वतंत्र विजपुरवठा व्हावा हा मुख्य उद्देश ठेवून शासनाच्या वतीने गावठाणात विद्यूत रोहित्र बसविण्यात आला आहे. यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच चर्मकार वस्ती उजाळून निघाली. मात्र गेल्या एक महिन्यापासून गावठाणालगत असलेला रोहीत्र जळाला. तो नादुरुस्त झाल्याचा रिपोर्ट देखील महावितरणला देण्यात आला.
१७ एप्रिल रोजी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा असल्याने रोहित्र लवकर बसविण्यात यावे. अशी मागणी ग्रामस्थांनी केली. महावितरणच्या वतीने रोहीत्र बसविण्यात आला. मात्र तीन दिवसांत तो रोहीत्र जळून गेला. पुन्हा वायरमनच्या सहाय्याने रिपोर्ट देण्यात आला. पाच ते सहा दिवसानंतर रोहीत्र बसविण्यात आला. तो वीज दिसण्यापूर्वीच जळून गेला. एका महिन्यात एक दोन ना असे तब्बल सहा रोहीत्र बसविण्याचा प्रताप महावितरणकडून करण्यात आला आहे. मात्र अद्यापही चर्मकार वस्तीमधील ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
महावितरणकडून नादुरुस्त रोहित्रांचा सपाटा
ग्राहकांना कायमस्वरूपी विद्यूत पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने महावितरणकडून सिंगल फेज योजना राबविल्या जातात. रोहीत्र नादुरुस्त झाला तर तो तात्काळ बदली करून विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण प्राधान्य देते मात्र महावितरणमार्फत ज्या ठेकेदारावराला रोहीत्र दुरूस्तीचे काम दिले जाते. त्यात क्वॉईलचे काम व्यवस्थित न करणे, ऑईल न टाकते, यासह त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मनस्ताप ग्रामस्थांना व महावितरणला देखील सहन करावा लागतो. सध्यातरी महावितरणकडून रोहित्र पे रोहित्र बसविण्याचा सपाटा सुरू आहे.
रात्री अंधार असल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरीचे प्रमाण वाढले आहे. सध्या उन्हाळा असल्याने महाभयंकर उष्णता आहे. घरात झोपले की उष्णता आणि बाहेर झोपले तर डास अशा दुहेरी संकटात ही वस्ती सापडली आहे. महावितरणकडून रोहीत्र बदलून दिला जातो. मात्र यासाठी पाच ते सात दिवसांचा कालावधी लागतो. दुसरा रोहीत्र बसविला की तो चालेलच याची शाश्वती नाही.
यामुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले असून महावितरणच्या वतीने तीन दिवसांत रोहीत्र बसवून विद्यूत पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब सातपुते, ग्रामपंचायत सदस्य संतोष केकडे, योगेश सातपुते, राजू सातपुते, गणेश सातपुते, अशोक सातपुते यांनी दिला आहे.
COMMENTS