पोलिसांची मात्र उडाली धांदल; बाभुळवाड्यातील तरूणावर गुन्हा दाखल पारनेर | नगर सह्याद्री तालुयातील बाभुळवाडे गावातील १६ वर्षाच्या मुलीवर अत्य...
पोलिसांची मात्र उडाली धांदल; बाभुळवाड्यातील तरूणावर गुन्हा दाखल
पारनेर | नगर सह्याद्री
तालुयातील बाभुळवाडे गावातील १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला असून, ती बेशुध्द असल्याची खोटी माहिती दारूच्या नशेत देण्यात आली. पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. पोलीस प्रशासनाच्या ११२ प्रणालीवर फोन करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी बाभुळवाडे येथील सचिन दिगंबर पंडित (वय ३६) याच्याविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी; गुरूवारी (दि. ११) रात्री ८ वाजून २० मिनिटांच्या सुमारास सचिन दिगंबर पंडित (वय ३६) याने त्याचा मोबाईल क्रमांक ९५०३०२८४४१७ वरून पोलीस प्रशासनाच्या डायल ११२ प्रणालीवर फोन केला. अस्मता या १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला असून, ती बेशुध्द असल्याचे त्याने सांगितले. माहितीनुसार नगर येथून पारनेर पोलीस ठाण्याकडे माहिती देण्यात आली. पारनेर पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक बाभुळवाडे येथे पोहचल्यानंतरप्रत्यक्षात तेथे तसे काही घडले नसल्याचे निष्पन्न झाले. सचिन दिगंबर पंडित याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे समोर आले.
सचिन पंडित याने पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून डायल ११२ या प्रणालीचा गैरवापर केल्यामुळे त्याच्याविरोधात पोकॉ संदीप साहेबराव पालवे यांनी फिर्याद दाखल केली. पालवे यांच्या फिर्यादीवरून सचिन पंडीत याच्याविरोधात लोकसेवकास खोटी माहिती पुरविणे, दारूबंदी अधिनियम कलम ८५/१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद वाघ, पोकॉ व्ही. एस. लोणारे पुढील तपास करीत आहेत.
COMMENTS