सोलापूर - सोलापुरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं एका आयोजकांना चांगलच महागात पडलं आहे. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना ...
सोलापूर - सोलापुरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं एका आयोजकांना चांगलच महागात पडलं आहे. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना गौतमी पाटीलचा सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र भगवान गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजक गायकवाड यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्था, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे गायकवाड यांना लेखी कळवले होते. मात्र कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता त्यांनी थेट कार्यक्रम आयोजित केला.
नियमांचा भंग केल्याने राजेंद्र गायकवाड यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 37(3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गौतमी पाटीलची अदाकारी बघायला आलेल्या बार्शीकरांचा हिरमोड झाला. दुसरीकडे आयोजकावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापुरातील बार्शी शहरात गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिच्या कार्यक्रमासाठी चाहत्यांनी खास तिकीटे काढून हजेरी लावली होती. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलने कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. टाळ्या आणि शिट्यांनी तिचं स्वागत करण्यात आलं होतं.
गौतमीच्या लावणी कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी डीडे बंद करायला लावला आणि कार्यक्रम बंद केला. गौतमीच्या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकरची हुल्लडबाजी आणि गोंधळ नको, म्हणून पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजेंद्र गायकवाड यांनी आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचं तिकीट 200 रुपये होतं. हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता सुरू होणार असल्याने चाहत्यांनी सहा वाजल्यापासून गर्दी करायला सुरुवात केली होती. पण तिचा कार्यक्रम सुरू व्हायला साडेनऊ वाजले. कार्यक्रम सुरू होताच पोलिसांनी हा कार्यक्रम बंद केला. त्यामुळे तिच्या चाहत्यांना फक्त एकाच लावणीवर समाधान मानावे लागले. चाहत्यांना 200 रुपयांत फक्त एक लावणी पाहायला मिळाली. नेहमीप्रमाणे गौतमीच्या या कार्यक्रमालादेखील चाहत्यांनी खूप गर्दी केली होती.
COMMENTS