अहमदनगर | नगर सह्याद्री नगर जिल्ह्यात वाढत्या जातीय तणावाच्या घटनांना आमदार नीतेश राणे कारणीभूत आहेत. आ. राणे यांनी महाराष्ट्रात जेथे जेथे ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर जिल्ह्यात वाढत्या जातीय तणावाच्या घटनांना आमदार नीतेश राणे कारणीभूत आहेत. आ. राणे यांनी महाराष्ट्रात जेथे जेथे भाषण केले, तेथे दंगली झाल्या. त्यांच्या भाषणाची लीप तपासल्यास याचा उलगडा होईल. त्यांनी नगर शहरात येऊन प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर जिल्ह्यात तणाव वाढला. शेवगाव येथील घटनेलाही तेच कारणीभूत आहेत, असा दावा करत आ. राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी. त्यांना नगर जिल्हा बंदी करावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकार्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
शिवसेना पदाधिकार्यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, रावसाहेब खेवरे, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अशोक गायकवाड, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक श्याम नळकांडे, संजय शेंडगे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जातीय तणाव वाढला आहे. ठिकठिकाणी जातीय दंगली घडत आहेत. नगर शहरात दंगल झाली. त्यानंतर १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी शेवगाव येथे दंगल झाली.
वारंवार होणार्या घटनांमुळे सामान्य जनता दहशतीखाली आहे. व्यापारी, महिला भगिनींमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. काही दिवसांपूर्वी नगर शहरात भाजप आमदार राणे यांनी सभा घेत प्रक्षोभक भाषण केले. दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. तेव्हापासूनच नगर शहर व जिल्ह्यात जातीय तणावाच्या घटना वाढून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेवगाव येथील दंगल चिथावणी खोर भाषणामुळे झाली आहे. या दंगलीची सखोल चौकशी करून जे खरे गुन्हेगार आहेत, त्यांचा शोध घेत कडक कारवाई करावी. तेथील व्यापारी वर्गाला संरक्षण मिळावे. आमदार राणे यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दंगली घडू शकतात. त्यामुळे राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. राणे यांना नगर जिल्ह्यात बंदी करावी, अन्यथा जिल्हाभर अंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
COMMENTS