गावात तणाव | पोलिस बंदोबस्त तैनात अहमदनगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवाला शेवटच्या दिव...
गावात तणाव | पोलिस बंदोबस्त तैनात
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवाला शेवटच्या दिवशी रविवारी (दि. ७) झालेल्या दंगलीमुळे गालबोट लागले. यात्रोत्सवाचा रविवारी शेवटचा दिवस म्हणून महिला, लहान मुले व नागरिकांनी गर्दी केली होती. रहाटगाडग्याजवळ (पाळणे) मुस्लिम व हिंदू समाजाच्या मुलांमध्ये सायंकाळी आठच्या सुमारास शाब्दिक चकमक झाल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. यानंतर दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सुमारे १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ९ जणांना अटक केली आहे.
नाचल्या नंग्या तलवारी
गेल्या काही दिवसांपासून जेऊरमध्ये अतिक्रमण, जागेच्या कारणावरुन तणावाचे वातारवण आहे. यात्रेच्या शेवटच्या दिवशी दोन गटात दगडफेक झाली. दगडफेक करणार्यांकडून तसेच हातात नंग्या तलवारी घेत रस्त्यावरुन फिरत गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. तलवारी घेऊन फिरणार्यांचा कायमचा बंदोबस्त करा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
यात्रेतील खेळण्याची दुकाने तसेच यात्रेत जमलेल्या नागरिक, महिला यांच्यावर सुमारे अर्धा तास दगडफेक सुरू होती. अचानक दगडफेक सुरू झाल्याने सर्वत्र पळापळ सुरू झाली. यामध्ये खेळण्याचे दुकानदार असलेल्या महिला व लहान मुले जखमी झाले. तसेच काही ग्रामस्थांनाही दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. एकूण दहा जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गोरख बनकर यांना डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दगडफेकीमुळे अनेक महिला, लहान बालके यात्रेतच अडकून पडले होते. अनेक लहान मुले पालकांपासून विभक्त झाल्याने रडारड सुरू होती. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ध्वनिक्षेपकावरून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते. परंतु परिस्थिती खूप भयानक व भितीदायक बनली होती. सर्वत्र नागरिक सैरा वैरा धावत होते. एका गटाकडून सुमारे १०० ते २०० लोकांचा घोळका अंधारातून यात्रेकरूंवर दगडफेक करत असल्याचे सांगण्यात आले. जेऊर गावात बाजारपेठेत दगडांचा मोठा खच पडला होता. जेऊर गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गावात दंगल झाल्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.
या दगडफेक प्रकरणी पोलिसच फिर्यादी झाले असून पोना दीपक गांगर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इद्रीस मुनीर शेख, मन्नू अलीम कुरेशी, अजीज रफिक शेख, हर्षद बागवान, साहिल बागवान, मुनीर खैरू शेख, शेख मुस्ताक, युनूस शेख, मुसा शेख, फइस रफिक शेख, अतुल उर्फ सोमनाथ सुखदेव तवले, सुनील दारकुंडे, गणेश दारकुंडे, दीपक शिंदे यांच्यासह इतर १०० ते १५० जण (सर्व रा. जेऊर बायजाबाई, ता.नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच इतर आरोपीचा शोध सुरु आहे.
‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा!
जेऊरमध्ये यात्रेदरम्यान दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दगडफेकीदरम्यान एका गटाकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याची माहिती समजत आहे. या प्रकारामुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहेत. दरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जेऊर गावातून जोर धरु लागली आहे.
पोलीस, वनमित्र पथकाची मदत
दंगलीनंतर पोलीस व मित्र पथकाचे सदस्य पत्रकार शशिकांत पवार, बंडू पवार, मायकल पाटोळे, सनी गायकवाड यांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. तसेच गावात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.
दहशतीमुळे गाव बंद
दगडफेकीत जखमी झालेल्यांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. घडलेल्या घटनेमुळे गावात भितीचे व तणावाचे वातावरण आहे. व्यावसायिकांनी भितीपोटी दुकाने बंद ठेवली आहेत. तसेच बंदोबस्तासाठी पोलिसांची एक तुकडी गावात तैनात करण्यात आली आहे.
COMMENTS