खा. संजय राऊत; अद्याप जागा वाटप नाही मुंबई | नगर सह्याद्री कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत जाग...
खा. संजय राऊत; अद्याप जागा वाटप नाही
मुंबई | नगर सह्याद्री
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला नसल्याचे एकीकडे सांगतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले होते, त्यामुळे त्या जागा आमच्याच आहेत, असे सांगत ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रात घडामोडींना वेग आला आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभा आणि देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या एकत्र होतील की स्वतंत्र यावरही संभ्रम असताना महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ जागांचे वाटप मविआतील मित्रपक्षांमध्ये कशाप्रकारे असेल? याची चर्चा सुरू आहे. फॉर्म्युला ठरल्याचे अंदाज लावले जात आहेत. याबाबत संजय राऊत यांना विचारणा केली. ते म्हणाले, आमची पहिली बैठक शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली. बैठकीला उद्धव ठाकरेही होते. पण १६-१६ चा फॉर्म्युला ठरला, ही बातमी मला तुम्ही देताय. आम्हाला माहिती नाही. बैठकीत जे काही ठरले, त्याबाबत बाहेर आलेली माहिती चुकीची आहे. असा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही.
निवडून कोण येणार, हे महत्त्वाचे; थोरात
आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसलो होतो, चर्चा झाली आहे. परंतु जागा वाटपाचा फॉम्य्यूर्र्ला अद्याप ठरला नाही, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना १९ जागांवर निवडून आली असल्याने त्या सर्व विजयी जागांवर आम्ही लढणार असल्याचे म्हटले होते. त्यावर थोरात म्हणाले, प्रत्येक जण आग्रही राहणार आहे तसे ते सुद्धा आग्रही आहेत. निवडून कोण येईल हा विषय जागा वाटपात महत्त्वाचा असेल. महाविकास आघाडी एकत्र लढल्यास राज्यात ४० जागा जिंकू.
लोकसभा जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा सुरू आहे. शरद पवारांकडे झालेल्या बैठकीत, बैठका कुणी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, काय सूत्र असावे यावर चर्चा झाली. आकडा ठरलेला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे आणि राहणार. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या वज्रमुठीनेच लढवल्या जातील. कुणी काहीही म्हणू द्या. बेकायदेशीर सरकारवाल्या लोकांनी काहीही म्हणू द्या. आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, होणारही नाहीत. आम्ही एकत्र राहूनच सध्याच्या घटनाबाह्य सरकारला सत्तेवरून घालवणार.
दरम्यान, जागावाटपात ठाकरे गटाला किती जागा मिळतील? या प्रश्नावर संजय राऊतांनी सूचक विधान केले. आम्ही काय बाजारात उभे आहोत का? आमचे लोकसभेत १९ खासदार राहतील. आम्ही त्या जिंकलेल्या जागा आहेत. त्या तर राहणारच. राष्ट्रवादीने ४ जागा जिंकल्या आहेत. त्यावर कशी चर्चा होणार? काँग्रेसने चंद्रपूरची एक जागा जिंकली असल्याने एक जागा त्यांच्याकडे राहणारच आहे. जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या असतात. त्या जिंकून आल्यानंतर कोण इकडे-तिकडे गेला, त्याने फरक पडत नाही. जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे आमचे आज महाराष्ट्रात १८ आणि दादरा-नगर हवेलीत एक खासदार निवडून आले आहेत. असे १९ खासदार आमचे आहेत. तो आमचा आकडा कायम राहील, असे मी म्हणतोय.
COMMENTS