राज्य महिला आयोगाची माहिती मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट...
राज्य महिला आयोगाची माहिती
मुंबई | नगर सह्याद्री
महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. पहिल्या चारमध्ये नगरचा समावेश आहे.
त्या म्हणाल्या, जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून १६०० मुली बेपत्ता झाल्या. फेब्रुवारी महिन्यात १८१० तर एप्रिल महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणार्या मुली आणि महिलांची संख्या वाढत असून, हे चिंताजनक आहे. यामध्ये २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी फार मोठी यंत्रणा कार्यरत असणे आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणे आवश्यक आहे.
फक्त अल्पवयीन मुली नाहीत
ज्या मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यामध्ये फक्त अल्पवयीन मुलींचा समावेश नाही. त्या मुलींची ओळख जाहीर केली जात नाही. १८ वर्षांवरील मुली आणि महिलांचाही या यादीत समावेश आहे. प्रेम प्रकरण, लग्नाचं आमीष, नोकरीचं आमीष या सगळ्याला बळी पडून बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे.
राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या १६ महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत. हरवलेल्या व्यक्तींचा अहवाल मागवत असतो. मागच्या महिन्यात महिला आयोगाने नागपूरमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असा कार्यक्रम घेतला. यामध्या राज्याचे गृहमंत्रीही उपस्थित होते. ‘सद्यस्थितीतली आव्हाने आणि उपाययोजना’ यांचा अहवाल आम्ही गृह विभागाला पाठवला आहे.
ग्रामीण भागातील प्रमाण जास्त
महत्त्वाचे म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून २२५८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर नाशिकमधून १६१, कोल्हापूर ११४, ठाणे १३३, अहमदनगर १०१, जळगाव ८१ तर सांगलीतून ८२ मुली बेपत्ता झाल्या आहेत.
मिसिंगमध्ये ज्या तक्रारी समोर येतात त्या मुलींचा शोध लागला नाही तर या मुली मानवी तस्करीत ओढल्या जातात. लग्नाचं आमीष, प्रेमाचं आमीष आणि नोकरीचे आमीष दाखवून या मुलींची दिशाभूल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. या संदर्भात गृहविभागाने तातडीने पावले उचलावीत, अशीही मागणी रूपाली चाकणकर यांनी केली आहे.
COMMENTS