हरियाणा राज्यातील पंचकुला येथून आरोपींना नागपूरकडे घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीची पाठीमागून येणाऱ्या ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला.
मुंबई / नगर सह्याद्री -
हरियाणा राज्यातील पंचकुला येथून आरोपींना नागपूरकडे घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीची पाठीमागून येणाऱ्या ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला. ही घटना समृद्धी महामार्गावर पांढरकडा गावाजवळ पहाटेच्या सुमारास घडली.
या अपघातात एका महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला, तर तीन कर्मचारी आणि आरोपी गंभीर जखमी झाले. पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण असे मृताचे नाव आहे. तर सहायक पोलिस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह मिठ्ठू जगडा, चालक शम्मी कुमार आणि आरोपी वैद्यनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना सावंगी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सावंगी पोलिसांनी सांगितले.
हरियाणाच्या पंचकुला पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण आणि त्यांचे तीन कर्मचारी परभणी येथून फसवणुकीचा आरोपी वैद्यनाथ शिंदे याला घेऊन पोलिस गाडीतून नागपूरच्या दिशेने जात होत्या. समृद्धी महामार्गावरून जात असताना पांढरकवडा गाव परिसरात पोलीस गाडी समोरील ट्रकला मागाहून धडकले. या भीषण अपघातात पोलिसांच्या गाड्याचे पुढील भागाचे नुकसान झाले. या अपघातात पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर पोलीस कर्मचारी आणि आरोपी गंभीर जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक, संदीप खरात हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी पोहोचले. जाम महामार्ग पोलीसही अपघातस्थळी पोहोचले. सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी ट्रक चालकालाही पोलिसांनी अटक केली आहे. सावंगी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघातातील पोलिस गाडी ताब्यात घेतली. पोलीस निरीक्षक धनजी जळक यांनी सांगितले की, पोलीस अधिकाऱ्याकडून १ ग्लॉक ९ एमएम पिस्तूल आणि १५ राउंड सुरक्षितपणे जप्त करण्यात आले आहेत.
COMMENTS