ठेकेदार, विक्री करणार्यांवर गुन्हा दाखल करावा | ग्रामपंचायत सदस्यांची लेखी तक्रार पारनेर / नगर सह्याद्री- तालुयातील राष्ट्रपती पुरस्कार प्...
ठेकेदार, विक्री करणार्यांवर गुन्हा दाखल करावा | ग्रामपंचायत सदस्यांची लेखी तक्रार
पारनेर / नगर सह्याद्री-
तालुयातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, निर्मल ग्राम व हरियाली अभियानासाठी राज्यामध्ये पुरस्कार मिळालेल्या गारगुंडी गावठाण हद्दीतील शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य विकास फापाळे यांच्यासह ग्रा. प. सदस्या गौरी गणेश झावरे, प्रतिभा बाबाजी झावरे, दादाभाऊ झावरे अर्जुन, रंगनाथ फापाळे यांनी केली आहे. झाडांची विक्री करणार्यांवर व संबंधित ठेकेदारांवर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
गारगुंडी ग्रामपंचायत हद्दीतील तसेच गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहीरीजवळील व स्मशानभूमी जवळील शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली आहे. ही झाडे जुन्नर येथील भाटिया नावाच्या व्यापार्याला परस्पर विकली आहेत. बेकायदेशीर वृक्ष कत्तल प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अन्यथा सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य विकास फापाळे व इतर् सदस्यांनी दिला आहे. सामाजिक वनीकरण, स्मशानभूमी, गावाच्या पाण्याची विहीर, हनुमान मंदिराशेजारी आणि गावठाण परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. गारगुंडी गावचे भूमिपुत्र मंत्रालय मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष स्व. हिरालाल फापाळे यांचे तसेच गावकर्यांच्या योगदानातून शेकडो झाडे येथे ४० ते ५० वर्षांपूर्वी लावली होती. या कामाची दखल घेऊन हिरालाल फापाळे यांना वनमंत्री सुरेश प्रभू यांनी वृक्ष मित्र पुरस्कार देऊन गौरविले होते. याच झाडांची कत्तल झाल्याने वनप्रेमींमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
गारगुंडी येथील सामाजिक वनीकरण तसेच गावाच्या सरकारी हद्दीतील (गावठाण) गेल्या दोन महिन्याच्या कार्यकाळात शेकडो झाडांची कत्तल करून सुमारे ३० ते ४० ट्रक परस्पर विक्री केली. त्यातून समाज कंटकांनी १० ते १२ लाख हडप केले. या प्रकाराची चौकशी करून गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. त्यात सुमारे ४० ते ५० वर्षांचे लिंब, करंजी, सुबाभुळ, वड, गुलमोहर चिंच असे अनेक वृक्ष होते. सामाजिक वनीकरण येथील झाडे तोडताना वन खात्याने संबंधित व्यापार्याला पकडले. ज्या गावाचा जिल्ह्यासह महाराष्ट्रात नावलौकिक असताना शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल होत असेल तर या जबाबदार कोण याची चौकशी करण्याची मागणी विकास फापाळे यांनी केली आहे.
COMMENTS