अहमदनगर | नगर सह्याद्री आपल्या नगर शहरामध्ये २४ वर्षांपूर्वी लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाने सुरू केलेल्या हनुमान चालिसा पाठाने अवघ्या देशभरात...
आपल्या नगर शहरामध्ये २४ वर्षांपूर्वी लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाने सुरू केलेल्या हनुमान चालिसा पाठाने अवघ्या देशभरातील वातावरण बदलल्याचे आपण पहातोच आहोत, असे प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी मोठ्या कौतुकाने म्हणाले.शहरातील गंजबाजार मधील सारडा गल्लीत असलेल्या श्रीलक्ष्मीनारायण मंदिरामधील लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाने आयोजित केलेल्या श्रीहनुमान कथा आणि हनुमान चालिसा माहात्म्य सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठाच्या उजव्या बाजूला श्रीगणेश पूजन करून श्रीराम पंचायतन असलेले प्रधान पीठ, रूद्रपीठ, नवग्रह पीठ, वर्धिनी कलश मंडलाची विधीवत स्थापना करण्यात आली होती. प.पू.स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी पुष्प अर्पण करून दर्शन घेतले. कथा निरूपणासाठी मुख्य व्यासपीठावर स्वामीजी स्थानापन्न होताच लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. श्रीहनुमान माहात्म्य या ग्रंथाचे पूजन झाले. याप्रसंगी वेदमूर्तींकडून उच्च स्वरात वेदमंत्रघोष सुरू होताच.
व्यासपीठ विविध आकर्षक फुलांनी सुरेख सजवण्यात आले असून स्त्री व पुरूषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. व्यासपीठावर मोठा एलईडी स्क्रीन लावण्यात आल्याने उपस्थित सर्व भाविकांना कथेचे निरूपण जवळून पहाण्याचा आनंद मिळू लागला. नगरमधील श्रीलक्ष्मीनारायण मंदिरामधील मूर्तींची आणि राजस्थान येथील श्रीसालसर हनुमानजींची प्रतिमा लक्ष वेधून घेते आहे. सभामंडपात सर्वत्र श्रीहनुमानजींच्या विविध रूपातील दुर्मिळ प्रतिमा लावण्यात आल्या असून त्याही भाविकांचे आकर्षण ठरल्या आहेत. हिरव्यागार झाडांची छानशी रोपे असलेल्या कुंड्या, नाजूक फुलांच्या लांबच लांब माळा आणि भगवे झेंडे लावून कथास्थळ उत्तमरित्या सजविण्यात आले आहे.
स्वामीजी पुढे म्हणाले, होळी पौर्णिमा ते हनुमान जयंती दरम्यान सामुदायिक हनुमान चालिसा पाठ सलग २४ वर्षे करून लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाने विक्रमच केला आहे. अयोध्येच्या श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त संपूर्ण जगामध्ये श्रीरामभक्तिच्या चेतनेचा संचार करण्याच्या उद्देशाने शतकोटी श्रीहनुमान चालिसा पाठ अभियानाचा शुभारंभ दिल्लीमधील अक्षरधाम मंदिराच्या प्रांगणात करताना आपल्या लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाचा आवर्जुन उल्लेख केला. सत्कर्माला सांगता नसते ते सातत्याने चालत राहिले पाहिजे. संपूर्ण श्रीरामकथेचे सारभूत व्यक्तिमत्व श्रीहनुमानजी आहेत.
महर्षी विश्वामित्र, महर्षी वसिष्ठ आणि महर्षी अगस्ती या तीन महर्षींनी श्रीरामरायांचे जीवन घडवले. दंडकारण्यात प्रवेश करणारे पहिले ऋषी महर्षी अगस्ती होते. त्यांच्याकडील शस्त्रसाठा पाहून श्रीराम चकित झाले होते. ज्या बाणाने श्रीरामांनी रावणास मारले तो बाण महर्षी अगस्तींनीच त्यांना दिला होता. ज्या दिवशी रावण मारला गेला त्या दिवशी सकाळी अगस्ती ऋषी श्रीरामांना भेटले होते. आपल्या नगर जिल्ह्याची भूमी अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने-वास्तव्याने पावन झालेली आहे. प्रभू श्रीरामजी हनुमानजींच्या कथेचे पहिले श्रोता आहेत. हनुमान चालिसा पाठ श्रध्देने केल्यास बुध्दी, आयुष्य, लक्ष्मी वाढते. बळ, यश मिळते. साधू, संत, संन्यासी, प्रवचनकार, अग्निहोत्री दिसताच नम्रतेने नमस्कार करावा. एका नमस्कारामधून ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला. कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता आपल्या उपासनेचे फळ आपणास देतातच. आपण श्रध्देने केलेल्या उपासनेचा एक अंशही वाया जाणारा नसतो.
सब देवो में देव निराले जय बम् बम् भोले...जय शिवशंकर जय शिवशंकर जय शंकर भोले...या स्वामीजींनी म्हटलेल्या सुरेल गीतावर उपस्थित सर्वांनीच ठेका धरला होता. कथास्थळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाने केलेल्या उत्तम नियोजनाचे भाविकांमधून भरभरून कौतुक होत होते. सामुदायिक महाआरतीने कथेची सांगता करण्यात आली. भाविकांना प्रसाद वाटपही करण्यात आले.
COMMENTS