मुंबई । नगर सह्याद्री - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. मनसे नेत...
मुंबई । नगर सह्याद्री -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. मनसे नेत्यांनी या हल्लाप्रकरणी थेट ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. घटनेनंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
मात्र या हल्ल्यात कोणत्याही वरीष्ठ राजकीय नेत्याचा समावेश नसल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील चौघांपैकी अशोक खरात हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ल्यानंतर प्रसिद्धी मिळून येणाऱ्या पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल, या आशेने अशोक खरातने हा कट रचल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकरांनी आदित्य ठाकरे-संजय राऊतांचे नाव घेतल्याने वातावरण तापले होते.
मनसे नेते संदीप देशपांडे 3 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. नेहमी त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र त्या दिवशी ते एकटेच होते. ही संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला आहे. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प आणि रॉड होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, हल्लेखोरांना देशपांडे यांनी चांगलाच प्रतिकार केला होता. दरम्यान, हल्लोखोरांशी झटापट करत असताना संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली.
COMMENTS