अहमदनगर | नगर सह्याद्री पाचशे वर्षांचा धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेलं अहमदनगर हे खर्या अर्थाने समृध्द परंपरा असलेलं शहर असून या शहरातील ऐ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
पाचशे वर्षांचा धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेलं अहमदनगर हे खर्या अर्थाने समृध्द परंपरा असलेलं शहर असून या शहरातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळे व त्यांचे महत्वही पर्यटकांना आकर्षित करणारे आहे.एकेकाळी निजामशाहीची राजधानी, संतांची भूमी असलेल्या या शहरातील विवीध धार्मिक, ऐतिहासिक वास्तूंना पर्यटकांनी भेट द्यावी व या शहराचे इतिहासातील महत्व जाणून घ्यावे यासाठी माथेरानमधे पर्यटकांना माथेरान प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहमदनगरला भेट देण्यासाठी विविध उपक्रमांतून साद घालतील, असे प्रतिपादन माथेरान प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी केले.अहमदनगर येथील रसिक ग्रूप व माथेरान प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नातून या शहराच्या पर्यटन वाढीसाठी अहमदनगर-माथेरान पर्यटन मैत्रीच्या उपक्रमास माथेरान येथे प्रारंभ झाला. यावेळी सावंत बोलत होते.
प्रसाद सावंत यावेळी बोलताना म्हणाले की,स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दोन शहराच्या पर्यटन मैत्रीचा या उपक्रमाचा प्रारंभ ही देशातील पहिलीच घटना असुन मैत्रीचा हा पुल दोन्ही शहराच्या पर्यटन वाढीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करताना आनंद वाटेल. अहमदनगर शहरावर मनापासून प्रेम करणार्या जयंत येलुलकर यांची ही अभिनव कल्पना भविष्यात मोठी विधायक चळवळ निर्माण करेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुलदीप जाधव म्हणाले की पर्यटन मैत्रीच्या माध्यमातून दोन्ही शहराचे नाते अधिक दृढ करण्यासाठी निश्चितच मदत होईल. माथेरान मधील लॉजींग, हॉटेल्सला भेट देणार्या नगरकर पर्यटकांना या मैत्री द्वारे सहकार्य करतांना विविध सवलती देताना त्यांचे मनापासून स्वागत करतील.
रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर म्हणाले की, अहमदनगर शहराला मोठी ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी असुन हे शहर यापूर्वीच पर्यटन नकाशावर यायला हवे होते. इतया समृद्ध वास्तू येथे आहेत.येथिल चविष्ट खाद्य संस्कृती देखील पर्यटकाना नक्कीचं प्रेमात पाडेल. आज जगात पर्यटनाला मोठे महत्व आले असून अहमदनगर शहर पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. इतिहासात हे शहर देशातील एक समृद्ध शहर होते. पर्यटकांचे माथेरान प्रमाणे नगरकर देखील तेवढ्याच उत्साहात स्वागत करतील. या पर्यटन मैत्री उपक्रमाद्वारे प्रथमच नगर शहराची माहिती असलेले सचित्र मोठे फलक पर्यटकांच्या माहितीसाठी लावले गेले.
यानिमित्ताने नगरला भेट देणारे पर्यटक ऐतिहासिक, धार्मिक वास्तूंच्या भेटी बरोबरच बाजारपेठेत देखील फेरफटका मारतील. शहराच्या पर्यटन, रोजगार विकासाच्या रसिक ग्रुपच्या या प्रयत्नास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हा प्रशासन, महापालिका नक्कीच सहकार्य करतील. वास्तूंचा, परिसराचा विकास करून पर्यटकांना सोयी सुविधा पुरवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माथेरान प्रतिष्ठानचे विवेक चौधरी यांनी स्वागत केले. रसिक ग्रूपच्या दिपाली देऊतकर यांनी आभार मानले. पाहुण्यांचा सत्कार सुदर्शन कुलकर्णी, समीर पाठक, प्रशांत अंतेपोलू, निखिल डफळ यांनी केला. यावेळी जयंत येलुलकर व रसिक ग्रूपच्या सदस्यांचा माथेरान प्रतिष्ठान, माथेरानकर नागरिक यांच्या वतीने खास सन्मान करण्यात आला.
COMMENTS