मुंबई | नगर सह्याद्री- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शर...
मुंबई | नगर सह्याद्री-
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व उद्धव सेनेशी विसंगत भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीत दुफळीचे चित्र आहे. शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे. शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शरद पवार याचे खंडन करत असले तरी मित्रपक्षांना त्यांच्या खेळीची धास्ती वाटतेय. यापूर्वी सावरकरांच्या मुद्यावर पवार यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले. आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद सोडताना आम्हाला विचारले नव्हते, अशी वक्तव्ये करून पवार आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत. सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निकाल जवळ येत चालला आहे. शिवसेनेतील फुटीमुळे सत्तेवरून पायउतार झालेल्या राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता हवी आहे. त्यासाठी सुप्रिम कोर्टातील निकालात एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरल्यास महाराष्ट्रात ‘नागालँड पॅटर्न’ची पुनरावृत्ती शय आहे का, याची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जाते.
भाजपला अनुकूल वक्तव्ये करणार्या शरद पवार यांच्या खेळीमुळे अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्रीच ‘सिल्व्हर ओक’वर धाव घेतली. तिथे उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे व संजय राऊत या चौघांत सुमारे सव्वा तास खलबते झाली. यातील चर्चेचा तपशील गोपनीय ठेवला असला तरी अजेंडा वादग्रस्त मुद्यांबाबतच असल्याची माहिती दोन्ही पक्षांतील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे बैठकीत काँग्रेसचा सहभाग नव्हता. राज्यात मविआच्या सात वज्रमूठ सभा होणार आहेत.
यापैकी दुसरी सभा १६ एप्रिलला नागपुरात होईल. त्या सभांमधून आघाडीची एकसंघ भूमिका दिसायला हवी. मतभिन्नता निर्माण होणारे विषय टाळायला हवेत, अशी अपेक्षा ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पहिल्या वज्रमूठ सभेत झालेल्या चुका यापुढे टाळण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सभांपासून दूर राहत आहेत. यासंदर्भात शरद पवार यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना बोलावे, अशी गळ ठाकरेंनी घातल्याचे समजते.
COMMENTS