नगर बाजार समिती रणधुमाळी; ४२ उमेदवारी अर्ज दाखल | सोमवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सुनील चोभे | नगर सह्याद्री माजी खासदार कै. दादा पाटील शे...
नगर बाजार समिती रणधुमाळी; ४२ उमेदवारी अर्ज दाखल | सोमवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत
सुनील चोभे | नगर सह्याद्री
माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये यावेळीही भाजप नेते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचा सत्तेसाठी तर नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रतिष्ठेसाठी संघर्ष पहावयास मिळणार आहे. बाजार समितीतील सत्ताधारी कर्डिले गटाला महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संदेश कार्ले, शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर, राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब हराळ, तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, काँग्रेसचे संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ यांच्या माध्यमातून तगडे आव्हान दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी
निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची वाढती संख्या आणि आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप नेते शिवाजी कर्डिले, महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांच्याकडून उमेदवारी दिली जाणार आहे. कर्डिले गटाकडून व महाविकास आघाडीकडून बाजार समिती निवडणुकीमध्ये कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी खासदार कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. गेल्या पंधरा वर्षापासून कर्डिले-कोतकर गटाने कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती वर्चस्व राखले आहे. नगर तालुका महाविकास आघाडीकडून बाजार समितीवरील कर्डिले-कोतकरांचे वर्चस्व मोडीत काढण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. बाजार समितीवरील सत्तेपासून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले गटाला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीकडून मातब्बरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून कडवे आव्हान दिले जाणार आहे.
उद्योजक अजय लामखडे मैदानात
नगर बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळीत उद्योजक अजय लामखडे उतरणार असल्याची माहिती आहे. उद्योजक अजय लामखडे स्वतः सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातून तर ग्रामपंचायत मतदारसंघातून मातोश्री संजना विलास लामखडे यांचा सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.
महाविकास आघाडीकडून संदेश कार्ले, शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, रामदास भोर, रोहिदास कर्डिले, संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, अंकूश शेळके, उद्योजक अजय लामखडे उमेदवारीच्या तयारीत आहेत. यातील हराळ, म्हस्के, शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. इतर सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कर्डिले-कोतकर गटाकडे इच्छुकांची संख्या जास्त
गेल्या पंधरा वर्षापासून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले-माजी सभापती भानुदास कोतकर यांची एकहाती सत्ता आहे. जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी कर्डिले यांची वर्णी लागल्याने कार्यकर्तेेही जोशात आहेत. त्यामुळे बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये संधी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांकडून अध्यक्ष कर्डिले यांची मनधरणी सुरु आहे. बाजार समितीसाठी कर्डिले गटाकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने कर्डिले यांची डोकेदुखी वाढली आहे.
कर्डिले गटाकडून काही अर्ज दाखल करण्यात आले असून सोमवारीच बहुतांश अर्ज दाखल होतील. आत्तापर्यंत दोन्ही गटाकडून ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी (दि. ३) दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. कर्डिले गट व महाविकास आघाडी या दोन्ही गटाकडून प्रचाराचे तगडे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच शेतकर्यांनाही बाजार समितीची निवडणूक लढविता येणार असल्याने दोन्ही गटाकडून तालुक्यातील प्रगतशील शेतकर्याला संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
सोसायटी मतदार संघ- सर्वसाधारण जागेकरीता
माजी उपसभापती भाऊसाहेब गंगाराम काळे यांचे २ अर्ज, माजी संचालक भाऊसाहेब नानासाहेब बोठे यांनी शेतकरी गटातून १ अर्ज भरला आहे. याशिवाय मधुकर किसन मगर, गणेश गोरक्षनाथ आवारे, सुधीर विश्वासराव भापकर यांचे २ अर्ज, मीनानाथ एकनाथ दुसुंगे, संपतराव बन्सीभाऊ म्हस्के यांचे २ अर्ज, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अरुण संपतराव म्हस्के यांचा शेतकरी गटातून १ अर्ज. विठ्ठल पंढरीनाथ दळवी यांचे शेतकरी गटातून २ अर्ज, अंकुश रावसाहेब शेळके यांचा शेतकरी गटातून १ अर्ज, माजी उपसभापती संतोष रामदास म्हस्के, केशव भगवान बेरड, माजी जि.प. सदस्य संदेश तुकाराम कारले आदींचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
COMMENTS