कर्डिले-कोतकर गटाला कपबशी तर महाविकास आघाडीला छत्री / 'त्या' दोघांची भूमिका निर्णायक सुनील चोभे / नगर सह्याद्री - नगर बाजार समिती न...
कर्डिले-कोतकर गटाला कपबशी तर महाविकास आघाडीला छत्री / 'त्या' दोघांची भूमिका निर्णायक
सुनील चोभे / नगर सह्याद्री -
नगर बाजार समिती निवडणूक रिंगणातून उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी अखेरपर्यंत महाविकास आघाडीमध्ये खलबते सुरु होते. एकमत न झाल्याने विठ्ठल दळवी व केशव बेरड यांचे अर्ज रिंगणात राहिले. दरम्यान, झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सोसायटी मतदारसंघातून विठ्ठल दळवी यांना अधिकृत उमेदवार जाहीर केेले आहे. तर हमाल/ मापाडी मतदासंघातील किसन सानप यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर केले आहे.
माजी खासदार कै. दादापाटील शेळके नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप नेते शिवाजी कर्डिले-माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या. तर दोन्ही गटाच्या पॅनेल व्यतीरिक्त तीन जणांचे अपक्ष म्हणून अर्ज राहिले. त्यातील सोसायटी मतदासंघातील विठ्ठल दळवी यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे.
तर हमाल / मापाडी मतदारसंघातील किसन सानप यांना महाविकास आघाडीने पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. तसेच पत्रही महाविकास आघाडीचे नेते आमदार नीलेश लंके, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, संपतराव म्हस्के यांनी दिले. निवडणूक रिंगणातील रा. वि. शिंदे व केशव बेरड यांच्याशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाली असून तेही महाविकास आघाडीला पाठिंबा देतील असे सांगितले जात आहे.
दरम्यान शुक्रवारी चिन्ह वाटप करण्यात आले. कर्डिले-कोतकर गटाला कपबशी तर महाविकास आघाडीला छत्री चिन्ह देण्यात आले आहे. तर केशव बेरड यांना पतंग, सुरेखा कोठुळे यांना खुर्ची, रा. वि. शिंदे यांना विमान चिन्ह मिळाले आहे. महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेेले किसन सानप यांना विमान चिन्ह मिळाले आहे. नगर बाजार समितीच्या १६ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजप-महाविकास आघाडीत काटे की टक्कर पहावयास मिळणार आहे.
COMMENTS