आत्महत्याग्रस्त शेतकरी पुत्राचे तहसीलदारांना निवेदन श्रीगोंदा | नगर सह्याद्री जिल्हा सहकारी बँकेने जमीन जप्तीची नोटीस दिल्याने वैफल्यग्रस्त...
आत्महत्याग्रस्त शेतकरी पुत्राचे तहसीलदारांना निवेदन
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
जिल्हा सहकारी बँकेने जमीन जप्तीची नोटीस दिल्याने वैफल्यग्रस्त शेतकरी विष्णू रामभाऊ कानडे (रा. पेडगाव ता. श्रीगोंदा) या शेतकर्याने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत विष्णू कानडे यांचे पुत्र अमोल विष्णू कानडे यांनी श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.
पुत्र अमोल कानडे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की पेडगाव सेवा संस्थेमध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या ऑडिटमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले. हा भ्रष्टाचार सेवा संस्थेचे कर्मचारी तसेच श्रीगोंदा सहकारी बँकेचे संबंधित अधिकारी यांनी संगनमताने केला.
संस्थेचे ऑडिटर यांनी ऑडिट रिपोर्टमध्ये तसा उल्लेख करून संस्थेच्या कर्मचार्यांवर गुन्हा दाखल केला. परंतु संस्थेच्या कर्मचार्यांकडून एवढी मोठी रक्कम वसूल होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर बँकेने कलम ८८ ची चौकशी लावून त्यामध्ये संस्था संचालकांना जबाबदार धरून वसुलीचा तागाता लावला. संचालकांनी रक्कम भरणा केला नाही तर त्यांची जमीन जप्त करून, विक्री करून रक्कम वसूल केली जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे. तसेच दिनांक २८/ ४/ २०२३ रोजी म्हणणे देण्यास सांगितले. आपला या भ्रष्टाचाराशी काहीही संबंध नसताना जिल्हा बँकेच्या कारवाईच्या दृष्टीने पेडगाव सेवा संस्थेचे माजी संचालक विष्णू रामभाऊ कानडे यांनी आत्महत्या केली.
दरम्यान सतत तोट्यात चालणारी शेती, अवकाळी पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान आणि वाढलेला खर्च त्यातच पेडगाव सेवा संस्थेत विष्णू कानडे मागील दहा वर्षांपूर्वी संचालक होते. ते संचालक असताना पेडगाव सोसायटीत भ्रष्टाचाराचे प्रकरण चांगलेच गाजले होते. परंतु संचालकाला याप्रकरणी जबाबदार धरत बँकेने सक्तीची वसुली सुरू केली. संचालकाला नोटीस मिळाल्यानंतर वैफल्यग्रस्त व निराश होऊन शेतकरी विष्णू कानडे यांनी जीवनयात्रा संपवल्याचे अमोल कानडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS