अहमदनगर | नगर सह्याद्री- बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने यंदा प्रथमच शहरातून श्री हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. आड...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने यंदा प्रथमच शहरातून श्री हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. आडते बाजार, डाळमंडईपासून कापड बाजारातून नियोजित असलेल्या या मिरवणुकीचा मार्ग पोलिसांनी अचानक बदलला व तेलिखुंटावरून चितळे रोडकडे मिरवणूक मार्गस्थ झाली. कापड बाजारातून मिरवणूक जाऊ देण्याची मागणी करत सुमारे अर्धातास तेलिखुंट चौकात मिरवणूक थांबवली होती. तेलिखुंट ते कापड बाजार मार्गावर मिरवणुकीत अनुचित घटनेची शयता असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना असल्याने मार्ग बदलल्याचे सांगण्यात आले.
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आडते बाजार, डाळमंडई येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. तेलिखुंट, कापड बाजार, भिंगारवाला चौक, अर्बन बँक चौकमार्गे नवीपेठ, नेताजी सुभाष चौक, चितळे रस्ता, चौपाटी कारंजामार्गे दिल्लीगेट असा मिरवणुकीचा मार्ग निश्चित होता. मिरवणूक निघण्याच्या काही पोलिस प्रशासनाने आयोजकांना बोलावून घेत कापड बाजारातून मिरवणूक न नेता तेलिखुंट येथून चितळे रस्त्याकडे जाण्याच्या सूचना दिल्या. आयोजकांकडून त्याला नकार देण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी तेलिखुंट चौकात बरिकेटींग करून कापड बाजारकडे जाणार रस्ता बंद केला. याठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिरवणूक तेलिखुंट चौकात आल्यावर कापड बाजारमार्गे जाण्यासाठी आयोजकांची मागणी होती. त्याला नकार देण्यात आला. त्यामुळे सुमारे एक तास तेलिखुंट चौकातच मिरवणूक रेंगाळली. पोलिसांनी भूमिका कायम ठेवल्याने मिरवणूक चितळे रस्त्याकडे मार्गस्थ झाली. तेलिखुंट ते कापड बाजार रस्त्यावर मिरवणुकीत अनुचित घटना घडण्याची शयता असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यामुळेच अचानक मार्ग बदलल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी नाराजी व्यक्त केली. परवानगी असूनही पोलिसांनी अचानक मार्ग बदलल्याचे त्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. तेलिखुंट चौकात डीजेवर हनुमान चालीसा वाजवण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हनुमान चालीसा पठण झाल्यानंतर पोलिसांनी मिरवणूक चितळे रस्त्याच्या दिशेने नेण्यास भाग पाडले.
COMMENTS