जामखेड | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याच्या लोकलेखा समितीसाठी माझे नाव गेले असल्याचे समजते जर अशी संधी मिळाली तर दिलेल्या सं...
जामखेड | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याच्या लोकलेखा समितीसाठी माझे नाव गेले असल्याचे समजते जर अशी संधी मिळाली तर दिलेल्या संधीचे सोने करेल युवांना संधी दिल्यानंतर युवा कशा पद्धतीने काम करू शकतात त्या पदाला कसे न्याय देऊ शकतात हे दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया आ. रोहीत पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
आ. रोहीत पवार हे बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने हमाल व व्यापा-यांच्या भेटी घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, उमेदवार राहूल बेदमूथ्था, सुरेश पवार व दत्ता खैरेसह कार्यकर्ते उपस्थित होते. बाजार समिती निवडणूकीत महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाने भाजपला दिलेल्या पाठींबा बाबत बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले, एखादा पक्ष किंवा तेथे असलेले पदाधिकारी लोकांचा विचार करत असतील किंवा त्यांच्याकडे त्या ताकदीचा उमेदवार असेल तर विचार करायला हरकत नाही.
त्यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. त्याच्यावरून त्यांना पक्षाचे अगर लोकांचे काही देणेघेणे पडलेले नाही. ज्या तिघांनी पाठींबा दिला त्या व्यक्तींचा त्यांच्या गावात अगर वार्डात काय प्रतिमा आहे हे तुम्ही तेथे जाऊन लोकांना विचारल्यावर समजेल उलट ते गेल्यामुळे आम्हाला मिळणार्या मतात वाढ होईल.
आमचे विरोधक (आ. राम शिंदे यांचे नाव न घेता) काही ठिकाणी सभा घेऊन माझ्यावर वैयक्तिक खालच्या पातळीवर टिका करीत आहेत. या निवडणुकीत भाषणे करण्याची गरज नाही याकरीता व्हिजन पाहिजे. ते पाच वर्षे मंत्री असताना काहीच केले नाही. मी आमदार झाल्यावर व कोरोना असतानाही मतदारसंघात मोठ़या प्रमाणावर कामे केली आहेत. तसेच याबाबत कागदपत्रे पुरावे आहेत परंतु त्यांनी कामे तर केली नाहीच परंतु मी आणलेल्या निधीला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला यावरून त्यांच्या कामाची पद्धत कळते.
रिफायनरी समर्थकावर पोलिसांनी अश्रुधराचा वापर केला यावर बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले, विकासकामांना आमचा विरोध नाही पण एखादा प्रकल्प राबवताना स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेतले पाहिजे परंतु सरकारने तसे न करता दडपशाही करून सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले यासाठी अश्रुधराचा वापर करून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला हे लोकशाहीला घातक आहे. आदरणीय पवार साहेबांनी आम्ही विकासाच्या विरोधात नाही असे सांगितले आहे. परंतु सरकार ब्रिटीश राजवटीसारखे वागत आहेत अशी टीका आ. रोहीत पवार यांनी राज्य सरकारवर केली.
COMMENTS