अहमदनगर | नगर सह्याद्री महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यांमध्ये धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवणार्या तिघा चोरट्यांन...
अहमदनगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यांमध्ये धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवणार्या तिघा चोरट्यांना नगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७ लाख ९२ हजार रुपये किमतीचे १३२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६ लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ गाडी व साडेचार लाख रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल असा १८ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ही माहिती दिली. सोमनाथ मधुकर चौबे (३३, मूळ रा. अशोकनगर, श्रीरामपूर, हल्ली कोळपेवाडी, ता. कोपरगाव), सिद्धार्थ रमेश बारसे (३०, अशोकनगर, श्रीरामपूर, सध्या रा. सिन्नर) व नाना भाऊसाहेब चव्हाण (२५, कोळपेवाडी, ता. कोपरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सोमनाथ चोभे कोळपेवाडी येथील घरी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला. सिद्धार्थ बारसे व नाना चव्हाण चोरीचे दागिने घेऊन कोळपेवाडी येथे विकण्यासाठी जाताना त्यांना पकडण्यात आले.
या तिघांनी लोणी, कोपरगाव, शिर्डी व संगमनेरमध्ये चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. यातील सोमनाथ चौबे विरुद्ध नगर, नाशिक व पुणे जिल्ह्यांत मोक्का, दरोडा, जबरी चोरी, विनयभंग अशा स्वरूपाचे २५ गुन्हे दाखल आहेत. रमेश बारसे याच्या विरोधात कर्नाटक, गोवा व श्रीरामपूरमध्ये ४ गुन्हे दाखल आहेत. गेल्या ३० ऑटोबर २०२२ रोजी हसदुर्गा, चित्रदुर्गा, कर्नाटक येथील श्रीमती नागरत्नम्मा डोडय्या शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी आल्या होत्या. त्या दर्शनासाठी पायी मंदिराकडे जाताना पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून पळ काढला होता. ही चोरी वरील तिघांनी केल्याचे आढळले होते. तिघे चोरटे मोटरसायकल वरून भरधावेगात येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढत. नंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीचा वापर करत असल्याचे आढळले.
या कारवाईत गुन्हे शाखेचे निरीक्षक आहेर, सहायक निरीक्षक गणेश वारोळे, उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, हवालदार विजयकुमार विटेकर, विश्वास बेरड, दिनेश मोरे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, संदीप दरंदले, विशाल दळवी, संदीप चव्हाण, संतोष लोंढे, रवी सोनटक्के, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, रणजीत जाधव, जालिंदर माने, मयूर गायकवाड, रवींद्र भुंगासे, आकाश काळे, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने भाग घेतला.
COMMENTS