अनेक दिग्गज रिंगणात | आता लक्ष माघारीकडे पारनेर | नगर सह्याद्री महाराष्ट्रात कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार ...
अनेक दिग्गज रिंगणात | आता लक्ष माघारीकडे
पारनेर | नगर सह्याद्री
महाराष्ट्रात कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी सोमवारी दुपारपर्यंत ४९ अर्ज दाखल झाले. सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारांचा आकडा शंभरी पार होण्याची शयता आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातून ४ जागेसाठी ८ उमेदवारी अर्ज सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत पर्यंत दाखल झाले होते.
सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निबंधक कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्त्व आमदार नीलेश लंके करत असून, माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख माजी सभापती काशिनाथ दाते, तालुकाप्रमुख रामदास भोसले, डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वात ठाकरे गट, तसेच विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, सुजित झावरे, वसंतराव चेडे, विकास रोहकले या निवडणुकीसाठी शिंदे-भाजपा गटाचे नेतृत्व करत आहेत.
संचालक राजेंद्र भंडारी यांची गोची ?
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश भंडारी यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. व्यापारी मतदारसंघातून आपली उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून की भाजपकडून दाखल करायची, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ते नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत सभापती प्रशांत गायकवाड, गणेश शेळके, उपसभापती विलास झावरे, रामदास भोसले, अशोक सावंत, अशोक कटारिया, बाबाजी तरटे, दौलत गांगड, अरुण ठाणगे, शिवाजी बेलकर, शिवाजी खिलारी, सुरेश पठारे, शिवाजी लंके, पंकज कारखिले, लहु भालेकर, आबासाहेब खोडदे, अण्णा नरसाळे, सुनील गाडगे, सुनील चव्हाण,विद्यमान संचालक मारुती रेपाळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी अर्ज छाननी होणार असून २० एप्रिलपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. त्यामुळे २० एप्रिलनंतर निवडणुक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेनेला सोबत येण्याचे आवाहन
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप-शिंदे गटाने स्वबाळाचा नारा देत स्वतंत्र बैठका घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. एकीकडे राज्यांमध्ये महाविकास आघाडी असताना पारनेर तालुयात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आपले स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसने जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेही राष्ट्रवादी बरोबर यावे, असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आवाहनाला शिवसेना प्रतिसाद देते की नाही, हे अर्ज माघारी दरम्यान कळणार आहे. सध्या तरी बाजार समितीच्या या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप-शिंदे गट अशा तिरंगी लढतीचे चित्र आहे.
या बाजार समिती निवडणुकीसाठी शुक्रवार अखेर सहकारी सेवा संस्था मतदारसंघातून ११ जागेसाठी विविध प्रवर्गातून ३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी अखेर ग्रामपंचायतच्या २ जागेसाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. व्यापारी मतदारसंघातून २ जागेसाठी तीन, हमाल मापाडीसाठी शुक्रवारपर्यंत एकही अर्ज दाखल नव्हता. निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप २१ एप्रिलला होणार असून २८ एप्रिलला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. २९ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
COMMENTS